रोहित न्यूझीलंड दौऱ्यामधून आऊट; दुखापतीमुळे वन डे व कसोटी मालिकेला मुकणार

375

टी-20 मालिकेत निर्भेळ यश संपादन करणाऱया हिंदुस्थानी क्रिकेट संघाला वन डे व कसोटी मालिकेपूर्वी धक्का बसला आहे. प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत असलेला रोहित शर्मा दुखापतीमुळे आगामी मालिकेत खेळू शकणार नाही. पोटरीच्या दुखापतीमुळे रोहित शर्मा उर्वरित न्यूझीलंडमधील मालिकांना मुकणार आहे.

रोहित शर्माची दुखापत गंभीर स्वरूपाची आहे. त्याला आता न्यूझीलंडमधील उर्वरित मालिकांमध्ये खेळता येणार नाही. फिजियोचे त्याच्या दुखापतीवर लक्ष आहे, असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून या वेळी सांगण्यात आले आहे. हिंदुस्थानचा संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन वन डे व दोन कसोटी सामन्यांत खेळणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी-20 सामन्यात रोहित शर्माने 60 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीदरम्यान त्याला दुखापत झाली. त्यानंतर तो पुन्हा मैदानात उतरला नाही. उर्वरित लढतीत लोकेश राहुलने टीम इंडियाचे नेतृत्व केले.

  • रोहित शर्माला दुखापतीमुळे मालिकेतून आऊट व्हावे लागले असल्यामुळे त्याच्याऐवजी टीम इंडियात कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वन डे मालिकेसाठी मुंबईकर पृथ्वी शॉला संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे लोकेश राहुलसोबत पृथ्वी शॉ सलामीला फलंदाजी करील. पण तिसरा पर्यायी सलामीवीर म्हणून मयांक अग्रवालला पसंती देण्यात येऊ शकते. तसेच शुभमन गिलच्याही नावाचा विचार केला जाऊ शकतो.
  • कसोटी मालिकेसाठी मयांक अग्रवालसोबत लोकेश राहुलला संधी मिळू शकते. झटपट क्रिकेटमधील लोकेश राहुलची कामगिरी जबरदस्त असून त्याचे पुन्हा एकदा कसोटीत पुनरागमन होऊ शकते. तसेच पृथ्वी शॉ व शुभमन गील यांच्यापैकी एकाला तिसरा पर्यायी सलामीवीर म्हणून चान्स देण्यात येऊ शकतो.
आपली प्रतिक्रिया द्या