न्यूझीलंडचा मालिका विजय

सामना ऑनलाईन । हॅमिल्टन

नील वॅगनरसह सर्व गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने मंगळवारी येथे समाप्त झालेल्या दुसऱया कसोटीत वेस्ट इंडीजला २४० धावांनी धूळ चारली आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशा फरकाने दिमाखदार विजय मिळवला. दुसऱया डावात शतक ठोकणारा रॉस टेलर सामनावीर ठरला.

न्यूझीलंडकडून मिळालेल्या ४४४ धावांचा पाठलाग करणाऱया वेस्ट इंडीजचा दुसरा डाव २०३ धावांमध्येच गडगडला. रोस्टन चेसने सर्वाधिक ६४ धावा केल्या, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. तसेच न्यूझीलंडच्या जबरदस्त गोलंदाजीपुढे त्यांचे इतर फलंदाज निप्रभ ठरले. पहिल्या कसोटीत दमदार कामगिरी करणाऱया नील वॅगनरने याही कसोटीत आपला ठसा उमटवला. त्याने या डावात ४२ धावा देत ३ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तसेच टीम साऊथी, ट्रेंट बॉल्ट व मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी २ गडी बाद करीत वेस्ट इंडीजच्या डावाला खिंडार पाडले.

ऍस्टले, फर्ग्युसनची एण्ट्री

वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी वन डे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये टॉड ऍस्टले व लॉकी फर्ग्युसन यांचे वन डे संघात पुनरागमन झाले आहे.