न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय

न्यूझीलंडने दुसऱया टी-20 क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर 4 धावांनी रोमहर्षक विजय मिळविला. सामनावीर ठरलेल्या मार्टिन गप्टीलचे अवघ्या तीन धावांनी शतक हुकले. मार्कस स्टोईनिस व डॅनियल सॅम्स यांनी आक्रमक फलंदाजी करीत ऑस्ट्रेलियाच्या आशा पल्लवित केल्या होत्या, मात्र ते आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवू शकले नाहीत. न्यूझीलंडने सलग दुसऱया विजयासह पाच सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.

न्यूझीलंडकडून मिळालेल्या 220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 8 बाद 215 धावांपर्यंतच मजल मारता आली. जोश फिलीप 45 धावांवर बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील मार्पस स्टोईनिस (78) व डॅनियल सॅम्स (41) यांनी तुफानी फलंदाजी करीत ऑस्ट्रेलियाला विजयाच्या वाटेवर नेले होते. स्टोईनिसने 37 चेंडूंत 7 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी केली, तर सॅम्सने 15 चेंडूंत 4 षटकारांसह 2 चौकार लगावले, मात्र अखेरच्या दोन षटकांत हे दोघेही बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाला विजयाने हुलकावणी दिली. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने 4, तर जेम्स निशामने 2 गडी बाद केले. त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 7 बाद 219 धावसंख्या उभारली. यात सलामीवीर मार्टिन गप्टीलने 50 चेंडूंत 97 धावांची खेळी करताना 6 चौकार व 8 षटकारांचा घणाघात केला. कर्णधार केन विल्यम्सन (53) व जेम्स निशाम (नाबाद 45) यांनीही उपयुक्त फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसनने सर्वाधिक 3 फलंदाज बाद केले.

आपली प्रतिक्रिया द्या