व्यापाऱ्याची लाखोंची बॅग पळवणाऱ्याला 40 मिनिटात अटक, नेवासा पोलिसांची कामगिरी

560

बस स्थानक परिसरातून नाशिकच्या व्यापाऱ्याची आठ लाखांची बॅग पळवणाऱ्या चोरट्याला नेवासा पोलिसांनी 40 मिनिटात अटक केली. सागर राजू माने असे आरोपीचे नाव आहे. नाशिकचे व्यापारी संजीव नवल यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली होती. दरम्यान, पोलिसांच्या या ‘झट की पट’ कामगिरीचे कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे संजीव नवल यांच्या मालकीचे प्लॉट असून त्याच्या विक्रीसाठी ते शेवगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेले. प्लॉट विक्री करून 8 लाख 52 हजारांची रक्कम घेऊन साडेसहाच्या सुमारास ते नाशिकला जाण्यासाठी शेवगाव बसस्थानकावर आले. बराच वेळ बस न आल्याने ते काळी-पिवळी गाडीने साडेआठच्या सुमारास नेवासा येथे आले आणि श्रीरामपूरकडे जाण्यासाठी रस्त्यावर थांबले.

यावेळी एका गाडीत बसत असताना फिर्यादीला आपली बॅग कोणीतरी ओढत असल्याचे जाणवले. त्यांनी बॅग पुढे ओढण्यासाठी प्रयत्न केला असता झटापटीत बॅगचा बंद तुटला. याचा फायदा घेऊन आरोपी बॅग घेन पळाला. नवल यांनी आरडाओरडा करत त्याचा पाठलाग केला. आरोपी काही अंतरावर असणाऱ्या साथिदाराच्या विना नंबर प्लेटच्या गाडीवर बसून श्रीरामपूरच्या दिशेने पळाला. फिर्यादीने आरडाओरडा केल्याने नागरिकांनी चोरांचा पाठलाग केला. तसेच स्थानिक पोलिसांनाही याची माहिती दिली.

यानंतर पोलीस निरीक्षक रणजित डेरे, सहायक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे यांच्या पथकाने नागरिकांच्या मदतीने सागर राजू माने (रा. हिंजवडी, पुणे) यास नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावरील साईनाथ नगर परिसरात पाठलाग करून पकडले.

आपली प्रतिक्रिया द्या