निधी खर्च करून नव्याने बांधलेला पाडले उभ्या धोंडीजवळील रस्ता खचला; बांधकामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह

शासनाचा निधी खर्च करून नव्याने बांधकाम केलेला पाडले येथील उभ्या धोंडीजवळील रस्ता पहिल्याच रिमझिम पडणाऱ्या पावसात खचला. या करिता शासनाकडून 1 कोटी 98 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता, मात्र पावसामुळे रस्ता खचल्यामुळे बांधकामाच्या दर्जाबाबत नागरिकांना प्रश्न पडला आहे.

3 जून 2020 रोजी घोंगावणाऱ्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने समुद्रात उसळलेल्या पाण्याच्या लाटांच्या माऱ्याने पाडले येथील उभ्या धोंडीजवळ समुद्राकडील रस्त्याची बाजू ढासळली होती. त्यामुळे दापोली हर्णेकडून आंजर्ले समुद्रकिनारपट्टी भागातून पाडले, आडे, केळशी, मांदिवली, देव्हारे आणि मंडणगडकडे जाणारा हा मार्ग सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवावा लागला होता. रस्त्याअभावी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ही बाब दापोली पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि पाडले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रविंद्र सातनाक यांनी आमदार योगेश कदम यांच्या निदर्शनात आणून दिली. तेव्हा योगेश कदम यांनी याची तातडीने दखल घेऊन ढासळलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी शासनाच्या पूरहानी या योजनेतून तब्बल 1 कोटी 98 लाखांचा विकास निधी प्रयत्न करून मंजूर करून घेतला होता. त्यामुळे रस्ता दुरुस्तीसह संरक्षण भिंत उभारण्याचे काम मार्गी लागले आणि या मार्गावरील खंडित वाहतूक पूर्ववत सुरू झाली, मात्र बांधकामानंतरच्या पहिल्याच पावसात पुन्हा रस्ता ढासळला. त्यामुळे या मार्गावरील एस.टी. सेवा बंद पडण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नव्याच्या नवलाईचे काही दिवसच लोकांना समाधान मानावे लागणार आहे. या घटनेमुळे काम करणारा ठेकेदार आणि कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, या मागणीसाठी येथील नागरिकांनी जोर धरला आहे.

आंजर्ले, पाडले, आडे, केळशी, मांदिवली, देव्हारे, मंडणगड या मार्गाचे महत्त्व लक्षात घेता या रस्त्याअभावी लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाकडे प्रयत्न करून आमदार योगेश कदम यांनी आडे आंजर्ले दहागाव रस्ता रा.मा. 138 मध्ये पूरहानी दुरुस्ती किमी 2.200 ते 3.200 रस्ता दुरुस्ती व संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी तब्बल 1 कोटी 98 लाख रुपयांच्या रकमेचा निधी अगदी तातडीने मंजूर करून घेतला. या मंजूर रकमेतून रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले होते. त्यामुळे आडे, पाडले, आंजर्ले ,केळशी परिसरातील रहिवाशांना, शाळा, महाविदयालयांमध्ये जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना, शासकीय कार्यालयात कामानिमित्त जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच इतर कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांसह प्रामुख्याने पर्यटकांना हा मार्ग सर्वात जवळचा व सोयीचा आहे, मात्र रस्ता ढासळल्यामुळे आंजर्ले, पाडले परिसरातील रहिवांशांना पुन्हा एकदा रस्त्याअभावी गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

दापोलीत पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली असली, तरी रविवारी रात्री ते सोमवारी सकाळी केवळ 10 अंश सेल्सिअस पावसाची नोंद हवामान खात्याने केली होती. एवढ्या कमी पडलेल्या पावसातच हा नव्याने बांधलेला रस्ता ढासळला, तर मुसळधार पावसारेत हा रस्ता टिकेल का ? याची अजिबात शाश्वती नाही. या रस्त्यासाठी केलेल्या कामाच्या दर्जाची कंट्रोल बोर्डाकरून चौकशी होऊन बांधकामाचा दर्जा तपासणे गरजेचे आहे. कामात हयगय करणाऱ्या दोषी अधिकारी आणि ठेकेदाराला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे, अशी मागणी पाडले ग्राम पंचायतीचे सरपंच रवींद्र सातनाक यांनी केली आहे.