मधुचंद्राची रात्रच ठरली अखेरची रात्र, नवविवाहित जोडप्याचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार

लग्नानंतर मधुचंद्रासाठी खोलीत गेलेल्या नवविवाहित जोडप्याचे मृतदेहच सकाळी बाहेर आले. उत्तर प्रदेशमधील बहराइच जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या जोडप्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. त्यामुळे लग्नघरामध्ये शोकाकूल वातावरण निर्माण झाले.

प्रताप यादव (वय – 30) आणि पुष्पा (वय – 20) यांचा 30 मे रोजी मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला होता. लग्नानंतर सर्व रीती-रिवाज पूर्ण झाल्यावर या जोडप्याला मधुचंद्राचे वेध लागले होते. दोघांसाठी विशेष खोलीही सजवण्यात आली होती. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सर्व पारंपारिक विधी पार पडल्यानंतर दोघे पती-पत्नी मधुंचंद्र साजरा करण्यासाठी खोलीत गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी उन्हं डोक्यावर आली तरी जोडप्याने दरवाजा उघडला नाही, त्यामुळे कुटुंबियांना शंका आली. कुटुंबियांनी सुरुवातीला दार ठोठावून जोडप्याला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा उघडताच यादव कुटुंबाच्या पायाखालची जमिन सरकली. दोघे पती-पत्नी मधुंचंद्रासाठी सजवण्यात आलेल्या बेडवर मृतावस्थेत आढळले.

कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. याचा अहवाल समोर आला आहे. दोघांचाही मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. यानंतर दोघांवरही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बहराइच जिल्ह्याचे एसपी प्रशांत वर्मा यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘इंडिया टूडे’ने हे वृत्त दिले आहे..

अतिउत्साह नडला?

दरम्यान, लग्नानंतरचा अतिउत्साह नवविवाहित दाम्पत्याला नडला असावा आणि उत्साहाच्या भरात मधुचंद्राच्या रात्री त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असावे असा अंदाच तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.