दहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेची आत्महत्या, मैत्रिणीच्या घरात घेतला गळफास

2168

अवघ्या दहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवार दुपारी तीन वाजून 20 मिनिटांनी वराळे येथील भीमाशंकर कॉलनी उघडकीस आली. विवाहित महिलेने मैत्रिणीच्या घरी आतून दरवाजा बंद करुन छताच्या लोखंडी हुकाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. संजना दीपक लोखंडे (वय 19, रा. भीमाशंकर कॉलनी वराळे ता.मावळ) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.

तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संजना लोखंडे हिच्या वडिलांनी आठ दिवसांपूर्वी गायकवाड यांच्यासोबत लग्न करुन दिले होते. लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी ती कोणाला काही न सांगता निघून गेली. ती तिच्या मैत्रिणीच्या घरी राहिली होती. तिचा शोध घरचे घेत होते.

शनिवार रोजी तिने तिच्या मैत्रिणीच्या घरी छताच्या लोखंडी हुकाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. मयत नवविवाहित संजना लोखंडे हिचा मामेभाऊ अक्षय रणपिसे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात खबर दिली. तळेगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक उंडे, उपनिरीक्षक राहुल कोळी, कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. घराचा दरवाजा तोडून मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन डॉ प्रवीण कानडे यांनी केले. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या