हंसगामिनी : परवडणाऱ्या किमतीतल्या डिझायनर साड्यांचा ब्रँड

9079

सामना ऑनलाईन । मुंबई

साडी हा तमाम महिलांचा विक पॉईंट. एरवी कामाच्या धबडग्यात रोज साडी नेसता न येणाऱ्या महिलांच्या मनातही साडीला स्वतःचं हक्काचं स्थान असतं. त्यामुळे महिला नेहमी नवनवीन साड्यांच्या शोधात असतातच. अशांसाठी एक चांगला पर्याय सध्या उपलब्ध झाला आहे. अभिनयाव्यतिरिक्त आपला स्वतःचा ब्रँड निर्माण करणाऱ्या मराठी अभिनेत्रींपैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे निवेदिता सराफ. अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या हंसगामिनी या साडी ब्रँडचं प्रदर्शन सध्या वांद्र्यात भरलं आहे. गेली पंधरा वर्षं स्वतःचा साडीचा व्यवसाय त्या सांभाळत आहेत.

हंसगामिनी या त्यांच्या ब्रँडची सुरुवात कशी झाली, या प्रश्नावर सामना ऑनलाईनशी त्यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मी गेली पंधरा वर्षं साड्यांचा व्यवसाय करते. पण, आधी मी कारागीरांकडून साडी विकत घेऊन मग त्या विकायचे. हळूहळू मग मी स्वतः डिझाईन केलेल्या साड्या विकायला सुरुवात केली. गेली पाचएक वर्ष मी हंसगामिनी या माझ्या ब्रँडखाली स्वतः डिझाईन केलेल्या साड्यांचा व्यवसाय करतेय, अशी माहिती निवेदिता सराफ यांनी दिली.

हंसगामिनी या नावामागची कथा सांगताना त्या म्हणाल्या की, खरंतर हे नाव माझ्या जन्मराशीतल्या अक्षरावरून ठेवलं आहे. हंस हा पक्षी त्याची चाल आणि नखऱ्यासाठी ओळखला जातो. त्याच्यावरूनच हे नाव माझे पती अभिनेते अशोक सराफ यांनी सुचवलं असल्याचं निवेदिता म्हणाल्या. या साडी ब्रँडच्या निर्मितीमागेही त्यांचा एक ठाम विचार त्यांनी स्पष्ट केला. अनेक महिलांना डिझायनर साड्या नेसायची इच्छा असते. पण दहा वीस हजारांच्या साड्या घेतानाही आपण विचार करतो. मग, त्यांना परवडेल अशा किमतीतल्या डिझायनर साड्या बनवण्याकडे माझा कल होता. हंसगामिनीच्या माध्यमातून मी परवडतील अशाच किमतीच्या डिझायनर साड्या बनवते. त्यासाठी हिंदुस्थानातील स्थानिक विणकरांकडे मिळणाऱ्या कापडापासून ते यंत्रमागाच्या कापडांपर्यंत अनेक पोत, पद्धती, रंगसंगतीच्या कापडांचा समावेश करते, अशी माहिती निवेदिता यांनी दिली आहे.

हंसगामिनी हा साडी ब्रँड ग्रेस फॉरएव्हर या एकत्रित प्रकल्पाचा एक भाग आहे. निवेदिता यांच्याखेरीज गुंजन कोवलगी आणि आरती तलरेजा यांचाही ग्रेस फोरएव्हर प्रकल्पात सहभाग आहे. लखनवी कुडते, दागिने, चपला, बॅग्ज या सर्वांसाठी एक एकत्रित प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. जेणेकरून प्रत्येक व्यावसायिकाला स्वतःच्या वस्तू विकण्यासाठी योग्य वाव आणि दालन मिळू शकेल. या खेरीज निवेदिता यांचा भविष्यात स्वतःच्या प्रिंट आणि ब्लॉक तयार करण्याचा मानस आहे. साडीनिर्मितीसाठी आदिवासी किंवा शरीरविक्रयाच्या दुष्टचक्रातून सोडवल्या गेलेल्या स्त्रियांचा समावेश करण्याचाही त्यांचा विचार आहे. जेणेकरून त्यांना स्वकष्टाच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य होऊ शकेल. हंसगामिनी हे प्रदर्शन 6,7 आणि 8 जून रोजी वांद्रे येथील कॅशे आर्ट गॅलरी येथे सुरू असणार आहे. तसंच पुढील प्रदर्शने कोल्हापूर, नाशिक आणि गोवा येथे होणार आहेत.

पाहा या प्रदर्शनाची फोटोगॅलरी-

आपली प्रतिक्रिया द्या