मुख्य संपादक पुरकायस्थ यांना अटक, ‘न्यूज क्लिक’च्या पत्रकारांवर दिल्ली पोलिसांची छापेमारी

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी वेबसाईट न्यूज क्लिकच्या पत्रकारांच्या 30हून जास्त ठिकाणी छापेमारी केली. या वेबसाईटला चीनकडून फंडिंग मिळत असून तीन वर्षांत 38 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. मंगळवारी रात्री न्यूज क्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर हेड अमित चक्रवर्ती या दोघांना अटक केली. पोलिसांनी दिल्ली-एनसीआर, मुंबईत टाकलेल्या धाडीत पत्रकारांचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले. तसेच काही पत्रकारांना समन्स बजावले.

5 ऑगस्टला ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने एक रिपोर्ट जारी केला होता. न्यूज क्लिकवर अमेरिकन नागरिक नेव्हील रॉय सिंघमकडून 38 कोटी रुपये घेणे व या बदल्यात चीनच्या बाजूने बातम्या चालवणे असा आरोप ठेवण्यात आला आहे. या रिपोर्टच्या आधारावर 17 ऑगस्टला न्यूज क्लिकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पत्रकारांविरुद्ध कलम-153(अ)सह यूएपीएचे कलम (13, 16, 17, 18 आणि 22) लावण्यात आले आहेत. न्यूज क्लिकसंबंधित 30हून जास्त ठिकाणी छापेमारी केली. दिल्ली पोलिसांनी  एकूण 37 पत्रकारांची चौकशी केली असून यात 9 महिलांचाही समावेश आहे. पत्रकारांवर करण्यात आलेल्या कारवाईचा ‘प्रेस क्लब ऑफ इंडिया’ आणि एडिटर्स गिल्डने निषेध नोंदवला आहे.

  • सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या मुंबईतील घरी पोलीस पथक पोहोचले. तिस्ता सेटलवाड या न्यूज क्लिकसाठी लेख लिहितात.
  • सीपीआय (एम) नेते सीताराम येचुरी यांच्या घरी दिल्ली पोलीस पोहोचले. माझा एक साथीदार तेथे राहतो. त्याचा मुलगा न्यूज क्लिकमध्ये काम करतो. पोलीस त्याच्या चौकशीसाठी येथे आले होते, असे  येचुरी म्हणाले.

या पत्रकारांच्या घरांवर छापा

छापे घातलेल्या पत्रकारांमध्ये प्रबीर पुरकायस्थ, संजय राजौरा, उर्मिलेश, भाषा सिंह, परंजॉय गुहा ठाकुरता, अनिंदो चक्रवर्ती, अभिसार शर्मा आणि सोहेल हाशमी यांचा समावेश आहे. हे सर्व जण यूज क्लिकशी संबंधित आहेत. अभिसार शर्मा हे नोएडात तर उर्मिलेश गाझियाबादमध्ये राहतात.

‘इंडिया’ आघाडीकडून निषेध

गेल्या नऊ वर्षांत भाजप सरकारने मीडियावर दबाव टाकण्याचे काम केले आहे.  मीडियाला आपले मुखपत्र करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत, असे इंडिया आघाडीने म्हटले आहे.