न्यूटन यांनी केले होते पृथ्वीच्या विनाशाचे भाकीत!

प्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता नेस्ट्रोदेमस यांनी कोरोना व्हायरससह केलेली अनेक भाकीते खरी ठरली आहेत. तसेच कोरोनाबाबत 40 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका कांदबरीतील उल्लेखही सत्यात उतरत आहेत. तसेच या वर्षात तिसऱ्या महायुद्धाची शक्यता असल्याचे भाकीत नेस्ट्रोदेमस यांनी केले आहे. जगावर मानवनिर्मित कोणतेही संकट आले नाही, तर पृथ्वीचा अंत कधी होईल, याचे भाकीत शास्त्रज्ञ आणि गतीचा शोध लावणाऱ्या आयझॅक न्यूटन यांनी गणीताच्या आधारे वर्तवले आहे. याआधी भविष्यशास्त्र आणि इतर प्राचीन शास्त्रांचा आधार घेत अशी भाकीते करण्यात आली होती. मात्र, न्यूटनसारख्या संशोधकाने गणीत आणि विज्ञान यांची सांगड घालून पृथ्वीच्या विनाशाचे भाकीत केले असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

न्यूटनने आपल्या नोट्स आणि पत्रातून जगाबाबत महत्त्वपूर्ण गोष्टींची नोंद केली आहे. त्यानुसार जगावर कोणतेही मानवनिर्मित संकट ओढवले नाही आणि 2060 पर्यंत जग अस्तित्वात असेल तर याच काळात पृथ्वीच्या विनाशाची सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. न्यूटन यांनी ही भविष्यवाणी करताना काही गोष्टींचा विचार केला होता. आधुनिक विज्ञानाचे जनक म्हणून न्यूटन यांची ओळख आहे. गतीचे नियम मांडणाऱ्या न्यूटन यांनी 1704 मध्ये एक नोट लिहीली होती. त्यांची ही नोट काही पत्रांसोबत मिळाली. 1727 मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांनी लिहीलेल्या नोट्स, पत्रे त्यांच्या घरात आढळली होती. न्यूटन यांनी जवळपास 10,000 नोट्स आणि पत्र लिहीली होती. त्यांच्या नोट्स, पत्रांचा 1936 मध्ये लिलाव करण्यात आला. या नोट्स येरुसलेममधील एका अभ्यासकाने सीक्रेट्स ऑफ न्यूटन या पुस्तकात प्रकाशित केल्या. हे पुस्तक आजही येरुसलेम विद्यापीठाच्या संग्रही आहे.

न्यूटन यांनी एका नोटमध्ये जगाचा विनाश होणार असल्याचे नमूद केले आहे. आपण अविनाशी असल्याचे मानवाला वाटत असेल तर ती त्याची मोठी चूक आहे. पृथ्वीवर एक काळ असा येईल की, मनुष्य निधर्मी होईल, तो कोणताही धर्म मानणार नाही. तीच पृथ्वीच्या विनाशाची सुरुवात असेल. एक दिवस जगाचा विनाश होणार आहे, हे सत्य आहे. जगात कोणतीही गोष्ट अविनाशी नाही. प्रत्येक गोष्टीचा अंत असतो आणि त्याची वेळही ठरलेली असते. त्यांनी वेळ, काळ आणि अर्धवेळ याच्या अभ्यासातून हे भाकीत केले होते. त्यांनी केलेल्या गणनेनुसार, जगाचा अंत आगामी 1260 वर्षात होणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, 1260 वर्षांची गणना कधीपासून सुरू करावी, असा प्रश्न त्यांना पडला. त्यानंतर त्यांनी वर्ष 800 हे मानक मानले. इसवी सन 800 मध्ये रोममध्ये धार्मिक क्रांती झाली होती. त्यानंतर रोमचा राजा चॅलीमॅगनने सत्तेपेक्षा पोपला महत्त्व दिले. त्यामुळे हे वर्ष त्यांनी मानक मानले. न्यूटनच्या या गणनेनुसार 1260 वर्षांचा काळ हा 2060 मध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे पृथ्वीचा विनाश 2060 मध्ये होणार असल्याचा दावा न्यूटन यांनी केला होता.

प्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांनीही जगाच्या विनाशाबाबत दावा केला होता. त्यांच्या दाव्यानुसार, पृथ्वीवरील मनुष्य प्रजाती ही अधिकाधिक 600 वर्ष जगू शकते. या 600 वर्षाच्या काळानंतर पृथ्वीचे रुपांतर एका आगीच्या गोळ्यात होईल. तसेच मानवाला 100 वर्षांच्या आत इतर ग्रहाचा शोध घेऊन मानवी वस्ती वसवावी लागणार आहे. लोकसंख्येचा विस्फोट झाल्यामुळे पृथ्वीवर ऊर्जा मोठ्या प्रमाणावर वापरली जाईल. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढतच जाईल. त्याच्या परिणामी पृथ्वीवरील वातावरण उष्ण होईल. स्टीफन हॉकिंग यांच्या दाव्यानुसार पृथ्वीचे तापमान शुक्र ग्रहाएवढे होईल. त्यानंतर पृथ्वीवर अॅसिडचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पृथ्वीचा विनाश होणार असल्याचे ते म्हणाले होते. भविष्यवेत्त्यांसह वैज्ञानिक आणि संशोधकांनीही पृथ्वीच्या विनाशाचे भाकीत केल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या