ऑनलाईन धोका, 90 लाख रुपये मिळवण्याच्या लालसेपोटी बेस्ट फ्रेंडची हत्या

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

अमेरिकेत एका एकवीस वर्षीय तरुणीने ऑनलाईन 90 लाख रुपये मिळवण्याच्या लालसेपोटी आपल्या बेस्ट फ्रेंडची हत्या केल्याचे समोर आले आहे. डेनाली ब्रेम्हर असे तिचे नाव आहे.

अलास्कात राहणाऱ्या डेनालीची फेसबुकवर इंडियानाच्या डेरिन शिल्मिलर या तरुणाबरोबर मैत्री झाली. आपण गर्भश्रीमंत असल्याचे डेरिनने डेनालीला सांगितले. डेरिनसारखा श्रीमंत व्यक्ती आपला मित्र असल्याचे डेनालीला अप्रूप वाटत होते. दोघांमध्ये रोज तासंतास गप्पा रंगू लागल्या. याचदरम्यान, डेरिनने डेनालीला तिच्या बेस्ट फ्रेंडची हत्या करण्यासाठी 90 लाख डॉलर ऑनलाईन देण्याची ऑफर दिली.

तसेच जर या हत्येचा व्हिडीओ किंवा ऑडिओ दिलास तर तुला 90 लाख डॉलरहून अधिक रक्कम देईन असे आमिषही डेरिनने डेनालीला दिले. एवढे पैसे मिळणार असल्याने डेनाली खूश होती. पैशांसाठी काहीही करण्यास तयार असणाऱ्या डेनालीने अजून चारजणांना या हत्येच्या कटात सामील करून पैशांचे आमिष दाखवले. त्यानंतर तिने तिची बेस्ट फ्रेंड असलेल्या सिंथिया हॉफमैन (19) हिला 2 जून रोजी डोंगरावर फिरण्यासाठी बोलावले. फिरताना सिंथियाला उंचावर नेऊन डेनिया व तिच्या साथीदारांनी तिचे हातपाय बांधले. नंतर तिच्या डोक्यात गोळ्या घालून तिचा मृतदेह नदीत फेकला. डेरिनकडून जास्त पैसे मिळावेत म्हणून या घटनेचा व्हिडीओही डेनियाने काढला व डेरिनला पाठवला.

दरम्यान, सिंथिया अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या घरातल्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण समोर आले. न्यायालयाने याप्रकरणी डेनिया व तिच्या साथीदारांना दोषी ठरवले आहे.