24 तास महत्त्वाचे, सतर्क राहा; राहुल गांधींचे पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन

24
rahul-gandhi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे असून त्या बनावट अंदाजाकडे लक्ष देऊ नका असे ट्विट करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आगामी 24 तास आपल्यासाठी महत्त्वाचे असून सतर्क राहा. मनात कोणतीही भीती बाळगू नका. आपली लढाई सत्यासाठी आहे. त्यामुळे बनावट एक्झिट पोलच्या दुष्प्रचाराला बळी पडू नका, आणि निराश होऊ नका, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही याआधी ट्विट करत अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि एक्झिट पोलमुळे निराश होऊ नका असे आवाहन केले होते.

एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे आणि बनावट असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. आगामी 24 तास आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सतर्क राहा. कोणतीही गडबड होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन राहुल यांनी केले आहे. एक्झिट पोलच्या अंदाजामध्ये एनडीएला बहुमत मिळण्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. हे पोल बनावट आहेत. त्यामुळे त्याकडे लक्ष देऊन विचलीत आणि निराश होऊ नका असे आवाहन त्यांनी केले आहे. आपण सत्यासाठी लढत आहोत. बनावट एक्झिट पोलच्या अंदाजाकडे लक्ष देऊ नका, कोणतीही भीती बाळगू नका. स्वतःवर आणि काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा. आपल्या मेहनतीला निश्चितच फळ मिळेल असे ते म्हणाले. ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होणार नाही. यासाठी सतर्क राहा, आगामी 24 तास आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे ते म्हणाले. या आधी प्रियंका गांधी यांनीही ऑडिओ संदेश जारी करत कार्यकर्त्यांनी एक्झिट पोलच्या अंदाजाकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन केले होते.

देशातील मतगणना होणाऱ्या स्ट्रॉगरुमबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. निवडणूक काळात चर्चेत असणाऱ्या भोपाळमध्येही स्ट्रॉगरुमबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. भोपाळमधून काँग्रेसचे दिग्विजय सिंह आणि भाजपकडून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर रिंगणात आहेत. विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेही स्ट्रॉगरुमबाहेर तळ ठोकून आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या