नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल – आदित्य ठाकरे

नाशिक, दि. २६ (प्रतिनिधी) – नाशिकमध्ये सत्ता कोणाची अन् विकासकामे कोण करतय, अशी स्थिती आहे. सत्ता नसतानाही शिवसेना जोरदार विकासकामे करीत आहे, सत्ता आल्यानंतर याहूनही अधिक कामे करू. या महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता येऊन भगवा फडकेल, असा आत्मविश्‍वास युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
नाशिक येथे विविध विकासकामांचे लोकार्पण सोमवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, शिवसेना शाखांनाही त्यांनी भेटी दिल्या. प्रभाग क्रमांक २४मध्ये त्यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यान, क्रीडांगण आणि ज्येष्ठ नागरिक सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. सायंकाळी शिवाजी चौकातील शाखेला भेट दिली, त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, नाशिकमध्ये मला प्रत्येकवेळी विकासकामांच्या भूमिपूजन, लोकार्पण अशा कार्यक्रमांना बोलविले जाते, सत्तेत कोण आणि काम कोण करतेय अशी स्थिती येथे असल्याचा टोला त्यांनी सत्ताधारी मनसेला हाणला. शिवसेना हाच विकासकामे करणारा पक्ष आहे याची खात्री जनतेला आहे. शिवसेना शाखा भेटीवेळी जमलेला प्रचंड जनसमुदाय पाहून ते म्हणाले की, सर्वांना सोबत घेवून चालणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. खांद्यावर हिंदुत्वाचा आणि छत्रपती शिवरायांचा भगवा आहे, सर्वत्र भगवी लाट आहे. सत्ता आपलीच येईल, महापौर शिवसेनेचाच होईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. मुंबईप्रमाणे नाशिकमध्ये लवकरच मुलींसाठी स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येईल, असेही ते म्हणाले. या सर्व कार्यक्रमांप्रसंगी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी, उपनेते बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, दत्ता गायकवाड, निवृत्ती जाधव, विनायक पांडे, अजय बोरस्ते, श्यामला दीक्षित, कल्पना पांडे, विलास शिंदे, जगन आगळे, नीलेश चव्हाण, सुधाकर बडगुजर, अनिल ढिकले, अनिता पांडे, शिवाजी चुंभळे, मामा ठाकरे, शिवराम झोले, माणिक सोनवणे, राहुल ताजनपुरे, दीपक दातीर, बंटी तिदमे, सुभाष गायधनी, नाना पाटील, प्रताप मटाले, राम सूर्यवंशी, अजित काकडे आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
मंदिरांवर चालून याल तर…
नाशिक शहरातील मंदिर हटविण्याच्या मोहिमेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘मला हेही माहिती आहे, जर या मंदिरांवर कोणी चालून आला तर मंदिर वाचवायला पहिला जो माणूस उभा राहील त्याच्या रक्तात भगवा आणि हातात शिवबंधन असेल.’

आपली प्रतिक्रिया द्या