इंग्लंडमधील काही रुग्ण स्वत:चे दात उपटायला लागले, कारण वाचाल तर हादरून जाल

इंग्लंडमध्ये दाताची समस्या असलेल्या रुग्णांसाठी फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉक्टरांची उपचारासाठी वेळ मिळत नसल्याने काही रुग्णांनी स्वत:चे दात उपटायला सुरुवात केली आहे. एका अहवालाद्वारे ही गंभीर बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. डॉक्टरांची वेळ मिळत नसल्याने काही रुग्ण हे स्वत:च दातांमधील पोकळी (कॅव्हिटी) भरण्याचा प्रयत्न करत आहेत. हेल्थवॉच इंग्लंडने एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यातून ही बाब उघडकीस आली आहे.

इंग्लंडमध्ये राष्ट्रीय आरोग्य योजना आहे. महागडे उपचार न परवडणाऱ्यांसाठी या योजनेअंतर्गत उपचार केले जातात. अनेक गरीब रुग्ण हे दाताच्या त्रासामुळे त्रस्त आहेत. जर या रुग्णांना योजनेअंतर्गत उपचार मिळाले नाहीत तर त्यांना खासगी डॉक्टरांकडे जावे लागेल. आरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेणारे बरेचसे रुग्ण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने त्यांना दाताच्या डॉक्टरची फी परवडणारी नसते, यामुळे हे रुग्ण त्रस्त झाले आहेत.

हेल्थवॉच इंग्लंडने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे की या योजनेअंतर्गत उपचार घ्यायचे असतील तर डॉक्टरांची अपॉईंटमेट मिळवण्यासाठी 2024 पर्यंत वाट पाहावी लागत आहे. इतका वेळ वाट पाहिल्यास या रुग्णांची समस्या बळावू शकते आणि त्याचा रुग्णालाच त्रास होऊ शकतो. या सगळ्यातून सुटका करून घेण्यासाठी काही रुग्णांनी आपले दात स्वत:च उपटायला सुरुवात केली आहे.

गरीब रुग्ण हे डॉक्टरांची उपचारांसाठी लवकर वेळ न मिळणे आणि खासगी डॉक्टरांची न परवडणारी फी अशा कात्रीत सापडले आहेत. 2014-2015 साली दातांच्या 9661 शस्त्रक्रिया झाल्या होत्या. 2019-2020 साली हे प्रमाण 8408 इतके खाली आले आहे. रुग्णांना डॉक्टरांची वेळ मिळवण्यासाठी महिनों महिने वाट पाहावी लागण्याची ही वेळ कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्भवलेली नाही असं अहवालातून दिसून आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या