इसिसच्या संपर्कात असणाऱ्या डॉक्टरला एनआयएकडून अटक; कटकारस्थान रचल्याचा आरोप

बंगळुरुच्या एका मेडिकल कॉलेजमधील एका नेत्ररोगतज्ज्ञाला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे. हा डॉक्टर इसिसच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. तसेच्या दहशतवाद्यांची मदत करणे आणि कटकारस्थान रचण्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे. अब्दुर्रहमान ( वय 28) असे त्याचे नाव असून ते एम.एस. रमैया मेडिकल कॉलेजमध्ये काम करतो. एनआयएने त्याला सोमवारी ताब्यात घेतले आहे. इसिससह इस्लामिक स्टेट खोरासान प्रोविन्सच्याही (आयएसकेपी) संपर्कात रहमान होता. याबाबत एनआयए अधिक तपास करत आहे.

आयएसकेपीशी संबधित पहिला गुन्हा दिल्लीत दाखल झाला होता. मार्च 2020 मध्ये दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कश्मीरच्या जहांजेब सामी आणि हिना बशीर या पतीपत्नीला अटक करण्यात आली होती. त्यांचा आयएसकेपीद्वारे इसिसशी संपर्क होता. देशविरोधी कारवाया केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. इसिसचा अबुधाबीतील मॉड्यूल मेंबर अब्दुल्ला बासीतसोबत त्यांचा संपर्क असल्याचे उघड झाले. त्यानंतर बासितलाही एनआयएने अटक केली आहे.

जहांजेब सामी आणि सिरीयातील इसिसच्या दहशतवाद्यांसोबत आपण काम करत असून एका योजनेवर काम करत असल्याची माहिती रहमानने एनआयएला दिली आहे. इसिसच्या घातपाती कारवाया यशस्वी करण्यासाठी मेसेजिंग प्लॅटफॉर्म बनवण्याच्या योजनेवर काम करत असल्याचे रहमानने सांगितले. तसेच संघर्षात जखमी झालेल्या इसिसच्या दहशतवाद्यांच्या मदतीसाठी मेडकल अॅप आणि दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवण्याबाबतचे अॅप विकसीत करण्याचा प्रक्रियेतही रहमान कार्यरत होता. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून पुण्यातील आणखी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती एनआयएने दिली आहे. रहमानने सिरीयाचा दौरा केल्याचेही तपासात आढळले आहे. 2014 मध्ये सिरीयातील इसिसच्या मेडिकल कॅम्पमध्ये रहमान गेला होता. दहशतवाद्यांवर उपचार करण्यासाठी तो 10 दिवस तेथील मेडिकल कॅम्पमध्ये होता. त्यानंतर तो हिंदुस्थानात परतला होता, अशी माहिती एनआयएने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या