
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नावाच्या संघटनेवर देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याने बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी छापेमारी करत पीएफआयच्या बऱ्याच कार्यकर्ते, नेत्यांची धरपकड केली होती. काही दिवसांपूर्वी एनआयएने केरळमधल्या एका फलवाल्याला अटक केली होती.त्याच्या चौकशीमध्ये काही धक्कादायक बाबी उजेडात आल्या आहेत. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे की मोहम्मद सादीक नावाच्या या फळ विक्रेत्याला पीएफआयने माहिती गोळा करण्यासाठी गुप्तहेर बनवलं होतं.
केरळमधल्या कोल्लम इथे भाजपचा एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला येणाऱ्या-जाणाऱ्यांवर नजर ठेवण्याचे काम सादीक करत होता. या कार्यक्रमाला येणाऱ्यांची माहिती काढून संघटनेला देण्याची जबाबदारी सादीकवर सोपवण्यात आली होती. असा संशय आहे की या कार्यक्रमात आलेले काही नेते पीएफआयच्या निशाण्यावर होते. 17 जानेवारीला पोलिसांनी शोधमोहीम राबवली होती, ज्यादरम्यान त्यांनी सादीकला ताब्यात घेतला होता. सादीक हा मन्नेझुथाराचा रहिवासी असून त्याला दोन मुले आहेत. सादीकची सध्या एनआयए कडून चौकशी सुरू असून सादीकच्या संपर्कात कोणकोण होते, तो नेमकं कसं काम करत होता आणि त्याने कोणती माहिती गोळा केली आहे याबाबत अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.
पीएफआय गुप्त माहिती गोळा करण्यासाठी स्थानिकांची निवड करत असते असं एनआयएच्या लक्षात आलं आहे. कोणाला संशय येऊ नये यासाठी स्थानिकांच्या मदतीने पीएफआय माहिती गोळा करत राहिली असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सादीक हा 2012 पासून पीएफआयच्या संपर्कात असून तो संघटनेसोबत राहून कट्टर धर्मांध बनला आहे. सादीककडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांची आणि त्यात सामील होणाऱ्या लोकांच्या नावाची यादी सापडली आहे.