साध्वी प्रज्ञासिंहसह सर्व सात संशयितांना आठवडय़ातून एकदा हजेरी लावावी लागेल

सामना ऑनलाईन । मुंबई

खटल्याची सुनावणी सुरू असताना न्यायालयात वारंवार गैरहजर राहणे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयितांना चांगलेच महागात पडले. या गैरहजेरीपणाची गंभीर दखल घेत मालेगाव बॉम्बस्फोट खटला चालविणाऱ्या मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने जामिनावर असलेल्या तसेच भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह या प्रकरणातील सातही जणांना आठवडय़ातून एकदा न्यायालयात हजेरी लावण्याची सक्ती केली. तसे स्पष्ट आदेशच विशेष न्यायमूर्ती विनोद पडाळकर यांनी या आरोपींना दिले. एवढेच नव्हे तर सबळ आणि ठोस कारण असल्याशिवाय या सातजणांपैकी कुणालाही न्यायालयात गैरहजर राहण्याची सवलत मिळणार नाही, असेही न्यायमूर्तींनी ठामपणे बजावले.

मालेगाव बॉम्बस्फोट खटला आता अंतिम टप्प्यावर पोहोचला असून या प्रकरणात सध्या साक्षीदारांचे साक्षी-पुरावे नोंदविण्याचे महत्त्वाचे काम सुरू आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात या सातजणांविरुद्ध न्यायालयाने आरोप निश्चित केले व त्यानंतर त्यांना जामीनही मंजूर झालेला आहे.

वास्तविक खटल्याची सुनावणी सुरू झाल्यास जामिनावर असलेल्या संशयितांनी न्यायालयात दररोज हजर राहणे बंधनकारक आहे, परंतु जामीन मिळाल्यापासून हे सर्व संशयित विशेष न्यायालयात फिरकलेच नाहीत. या सातजणांपैकी एक असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर तर भोपाळ येथून निवडणूक लढवत असून त्यात त्यांच्या प्रचारकामात व्यस्त आहेत, तर ले. कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी हे सर्वजण विविध कारणे पुढे करून न्यायालयात सातत्याने गैरहजर राहत आहेत.

या सर्वांच्या वागणुकीने त्रस्त झालेल्या न्यायमूर्ती पडाळकर यांनी अखेर या सर्वांना दम भरत आठवडय़ाला किमान एक दिवस तरी न्यायालयात हजर व्हा, असे आदेश दिले. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 मेपर्यंत तहकूब केली.