उत्तर प्रदेशात हॉस्टेलमध्ये एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला आहे. या तरुणीचे नाव अनिका रस्तोगी असून ती लखनौच्या राम मनोहर लोहिया कायदा विद्यापीठात शिकत होती. अनिका कायद्याचा दुसऱ्या वर्षात शिकत असून तिचे वडिल आयपीएस अधिकारी आहे.
शनिवारी रात्री अनिका हॉस्टेलच्या आपल्या रुममध्ये गेली आणि बराच वेळ झाला ती बाहेर आली नाही. तेव्हा तिच्या मैत्रिणींनी दार वाजवले तरीही तिचा काहीच आवाज आला नाही. तेव्हा हॉस्टेल प्रशासनाने दरवाजा तोडून तिच्या रूममध्ये प्रवेश केला. तेव्हा अनिका जमिनीवर पडलेली होती. अनिका बेशुद्ध असल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
अनिकाने आतून दरवाजा बंद केला होता आणि रुममध्ये कुठल्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अनिकाचे वडिल आयपीएस असून ते राष्ट्रीय सुरक्षा दलात कार्यरत आहेत. अनिकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस याचा शोध घेत आहेत.