एनआयएचे 13 राज्यांत छापे; पीएफआयच्या 106 जणांना अटक

दहशतवाद्यांना पैसे पुरवत असल्याच्या संशयावरून एनआयएने गुरुवारी मध्यरात्री मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रँट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) 13 राज्यांमधील कार्यालयांवर छापे टाकले. या धडक कारवाईत 106 जणांना अटक करण्यात आली असून त्यात संघटनेचा प्रमुख ओमा सालम याचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते.

एनआयएच्या तीनशे अधिकाऱयांनी ईडी आणि एटीएसच्या मदतीने उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, आसाम, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, पुडूचेरी आणि राजस्थान या राज्यांमध्ये छापेमारी केली.

पाप्युलर फ्रण्ड ऑफ इंडियाच्या नवी मुंबई आणि भिवंडी येथील कार्यालयांवर एनआयएच्या पथकाने आज कारवाई केली. नवी मुंबईतील नेरुळ येथील सेक्टर 23 मध्ये पीएफआयचे कार्यालय आहे. एनआयएच्या अधिकाऱयांनी या कार्यालयातील कागदपत्रे जप्त करून दोघांना ताब्यात घेतले आहे. भिवंडी शहरातील बंगालपुरा येथेही मोईनुद्दीन मोमीन या व्यावसायिकाने पीएफआयचे कार्यालय सुरू केले होते. एनआयएच्या अधिकाऱयांनी या कार्यालयावरही धाड टाकून मोमीन याला ताब्यात घेतले आहे.

नाशिकमधील पाचजण

पीएफआयच्या पाचजणांना महाराष्ट्र एटीएसने ताब्यात घेतले आहे. मालेगावातून पहाटे तीन वाजता मौलाना सैफूर रहेमान याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यासह बीड, पुणे व अन्य ठिकाणांहून चौघांना ताब्यात घेण्यात आले. या पाचजणांना नाशिकच्या एटीएस कार्यालयात आणण्यात आले. दुपारनंतर न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने त्यांना बारा दिवसांची कोठडी दिली आहे. जळगावमधूनही एकाला अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रातून 20 जणांना अटक

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मुंबई, नाशिक, नवी मुंबई, जळगाव, भिवंडी येथे कारवाई करत तब्बल 20 जणांना अटक केली आहे. त्यात मुंबईतील 5 जणांचा समावेश आहे.