ट्रम्प यांचे निकी हॅलेंशी प्रेमसंबंध, लेखकाच्या दाव्यामुळे खळबळ

26

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

अमेरिेकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रंगेल स्वभाव जगजाहीरच आहे. ते जेव्हा अध्यक्षपदी निवडून आले तेव्हा त्यांच्या अध्यक्षपदासोबतच त्यांच्या अफेयरच्या चर्चा देखील तितक्याच रंगल्या होत्या. कधी पॉर्न स्टारसोबत तर कधी चित्रपट अभिनेत्रींसोबत त्यांचे नाव जोडले गेले आहे. सध्या याच रंगेल स्वभावामुळे ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ट्रम्प यांचे अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील अधिकारी निकी हॅले यांच्यासोबत अफेयर सुरू असल्याचे बोलले जात आहे. प्रसिद्ध लेखक मायकल वुल्फ यांच्या प्रचंड खप झालेल्या ‘फायर अॅण्ड फ्युरी’ या पुस्तकातून त्यांनी या अफेयरबाबत सांगितले आहे.

वुल्फ यांच्या पुस्तकानुसार ट्रम्प आणि निकी हॅले सध्या एकमेकांसोबत अधिकाधिक वेळ घालवत आहेत. अनेकदा दौऱ्यावर जाताना या दोघांसाठीच हवाई दलाचे खास विमान असते. इतर अधिकारी वेगळ्या विमानाने येतात. ट्रम्प यांच्यासोबतच्या संबंधांमुळे निकी हॅले यांना त्यांच्या राजकीय कारकीर्दीत चांगलाच फायदा होणार आहे. त्यासाठी ट्रम्प त्यांना मदतही करत आहेत असं या लेखकाचं म्हणणं आहे

दरम्यान निकी हॅले यांनी या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे. “लोकांना यशस्वी महिला दिसली की तिच्यावर चिखलफेक करणं सुरू करतात. काहीही नसताना एखाद्यावर असे आरोप करणे चुकीचे आहे. याविरोधात मी लवकरच कायदेशीर कारवाई करणार आहे.” असे हॅले यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टेफनी क्लिफोर्ड या पॉर्न स्टारला जवळपास ८२ लाख रुपये दिल्याचं वृत्त समोर आलं होतं. पॉर्न स्टार सोबतचे संबध लपवण्यासाठी हे पैसे ट्रम्प यांनी दिले असल्याचं वृत्त ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्रानं छापलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या