श्रीलंकेविरुद्ध विजयासाठी हिंदुस्थानचा हा असेल ‘मास्टर प्लॅन’

15

सामना ऑनलाईन । कोलंबो

तिरंगी टी-२० मालिकेत सोमवारी हिंदुस्थान आणि श्रीलंका संघामध्ये सामना रंगणार आहे. निधास ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने हिंदुस्थानचा ५ विकेट आणि नऊ चेंडू राखून पराभव केला होता. पराभवाचा बदला घेण्याची चांगली संधी हिंदुस्थानकडे असणार आहे.

श्रीलंकेला झटका; कर्णधार चंडिमलवर दोन सामन्यांची बंदी

फायनलची दावेदारी होणार भक्कम
तिरंगी मालिकेत आतापर्यंत तिन्ही संघ एकमेकांशी एक-एक सामना खेळले आहेत. प्रत्येक संघाच्या खात्यामध्ये दोन-दोन पॉईंट असून आजच्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाची फायनलसाठी दावेदारी भक्कम होणार आहे.

धवन बरसणार
हिंदुस्थानचा सलामीवर शिखर धवनवर आजच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध पुन्हा एकदा मोठी खेळी करण्याची जबाबदारी असणार आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात अर्धशतक झळकावत धवनने एकहाती किल्ला लढवला होता. पहिल्या सामन्यात ९० आणि दुसऱ्या सामन्यात ५५ धावांची खेळी करणाऱ्या धवनच्या नावावर मालिकेमध्ये सर्वाधिक १४५ धावा आहेत.

उनादकट-चहलवर जबाबदारी
श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्यात हिंदुस्थानी गोलंदाजांनी सुमार गोलंदाजी केली होती. त्याचमुळे हिंदुस्थानने दिलेल्या १७५ धावांचे आव्हान लंकेने ९ चेंडू राखून पूर्ण केले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात हिंदुस्थानी गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत बांगलादेशी फलंदाजांना कमी धावसंख्येत रोखले होते. या सामन्यात उनाडकट, चहल, ठाकूर आणि विजय शंकरने आपली छाप सोडली होती. आजच्या सामन्यातही लंकेच्या फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी यांच्यावर असणार आहे.

रोहितचे फॉर्मवर प्रश्नचिन्ह
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाची धुरा सांभाळणाऱ्या मुंबईकर रोहित शर्माच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या सामन्यात शुन्य धावांवर बाद झालेला रोहित दुसऱ्या सामन्यात खराब फटका खेळून लवकर बाद झाला होता. त्यामुळे गेल्या दोन्ही सामन्यात हिंदुस्थानला मोठी सलामी मिळालेली नाही. एका बाजूने धवन धावांचा पाऊस पाडत असताना रोहित झटपट बाद होत आहे. मागील पाच सामन्यात रोहितला एकदाही ३० धावांचा आकडा पार करता आलेला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात मोठी खेळी करण्याचा दबाव रोहितवर असणार आहे.

राहुलला संधी मिळण्याची शक्यता
अंतिम ११ खेळाडूंमध्ये के.एल. राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे. राहुलच्या पुनरागमनामुळे ऋषभ पंतला बाहेर बसावे लागेल. ऋषभने दोन्ही सामन्यात विशेष कामगिरी केलेली नाही. श्रीलंकेविरुद्ध २३ आणि बांगलादेशविरुद्ध ७ धावा काढत तो बाद झाला होता. त्यामुळे टी-२०मधील शतकवीर राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेला धक्का
श्रीलंकेला आजच्या सामन्यात कर्णधार दिनेश चंडीमलच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरावे लागणार आहे. बांगदेशविरुद्ध सामन्यात षटकांचा वेग कमी राखल्यामुळे त्याच्यावर आयसीसीने दोन सामन्यांची बंदी घातली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या