33 लाखांचे कोकेन विकायला आलेला नायजेरियन तस्कर गजाआड

अंधेरी येथे एक कोटीचे चरस पकडल्यानंतर अमली पदार्थविरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटने वाडीबंदर परिसरात मोठी कारवाई केली. त्या ठिकाणी कोकेन विकण्यासाठी आलेल्या नायजेरियन ड्रग्जमाफियाला रंगेहाथ पकडून तब्बल 33 लाख रुपये किमतीचे व 110 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले.

वाडीबंदर येथील पी. डिमेलो मार्गावरील लोहाभवर बस स्टॉपजवळ एक नायजेरियन ड्रग्जमाफिया कोकेनची डिलिव्हरी देण्यासाठी येणार असल्याची माहिती आझाद मैदान युनिटचे अंमलदार पांगम यांनी मिळाली. त्यानुसार मग वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार उमुन्ना एनदुबुईसी विलियम्स (44) हा नायजेरियन इसम तेथे येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 110 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले. खारघर येथे राहणारा विलियम्स कोणाला कोकेन विकायला आला होता याचा पोलीस शोध घेत आहेत.

सहा महिन्यांत दहा नायजेरियन ड्रग्जमाफिया गजाआड; साडेसहा कोटींचा ड्रग्ज जप्त

मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाकडून ड्रग्जविरोधात धडक कारवाया सुरूच आहेत. अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पाच युनिटने जानेवारीपासून आतापर्यंत ठिकठिकाणी कारवाया करीत दहा नायजेरियन ड्रग्जमाफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर त्यांच्याकडून एकूण एक हजार 335 ग्रॅम एमडी आणि एक हजार 614 ग्रॅम कोकेनचा साठा जप्त केला आहे. या जप्त ड्रग्जची किंमत सहा कोटी 38 लाख इतकी असून यापुढेही अशा कारवाया सुरूच राहणार असल्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या