व्यापाऱ्याला गंडविणाऱ्या नायजेरीयन टोळीचा पर्दाफाश, ३ आरोपींना अटक

26

सामना ऑनलाईन । अमरावती

अमरावती शहरातील एका कापड व्यावसायिकला तब्बल ६७ लाख रूपयांनी गंडविणाऱ्या नायजेरीयन टोळीचा गुन्हे शाखेने सायबर सेलच्या मदतीने पर्दाफाश करण्यात यश मिळविले आहे. या टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये एका तरूणीचाही समावेश आहे. त्यांच्याकडून १८ मोबाईल, ३ इंटरनॅशनल सिम, ३ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. माईक केवीन फिलीप उर्फ बोबो उर्फ डॉकॉसमॉस, एमेका फेवर इफेसिनाची दोघेही नायजेरीया आणि स्नेहा पांडूरंग देरकर उर्फ आदिती शर्मा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

माईक हा मुंबई येथील खारघर, तर एमेका व सुकेशिनी हे तळोजा येथे वास्तव्यास आहे. या तिघांनी अमरावती शहरातील विष्णूनगर भागात राहणारे कापड व्यावसायीक कैलास शिवप्रसाद तिवारी यांना कॅन्सर व एड्सवर उपचार म्हणून उपयोगात येणाऱ्या अकिकबरा हर्बल सिड्सचा व्यवसाय करण्याची बतावणी करून तब्बल ६७ लाख रूपयांनी गंडविले होते.

काही दिवसांपूर्वी सुकेशिनीने आदिती शर्मा नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून कैलास तिवारी यांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविली़ कैलास तिवारी यांनी रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्यांच्यामध्ये चॅटिंग सुरू झाली. यावेळी दोघांनीही एकमेकांना आपल्या व्यवसायाबाबत विचारणा केली. सुकेशिनीने आपण एड्स व कॅन्सरवर उपचारासाठी उपयोगात येणाऱ्या अकिकबरा हर्बल सिड्सचा व्यवसाय करीत असल्याचे सांगितले. यावेळी व्यापारी कैलास तिवारी यांनी सदर औषधाची मागणी केली, त्यानुसार सुकेशिनीने तिवारी यांना मेल पाठवून अकाऊंटवर पैसे भरण्यास सांगितले. यावेळी तिवारी यांनी १ लाख ६३ हजार रूपयांचा भरणा केला काही दिवसांनी त्यांना हर्बल सिड्सचे पाकिट प्राप्त झाले.

पाकिट मिळाल्यानंतर तिवारी यांनी सुकेशिनीला याबाबत अवगत केले़ त्यांच्यात झालेल्या चर्चेअंती सुकेशिनीने तिवारी यांना हर्बल सिड्सचा व्यवसाय करण्याचे सुचविले. मधल्या काळात माईक केबीन उर्फ डॉ़कॉसमॉस याने अमरावतीत येवून कैलास तिवारी यांची भेट घेतली. त्यामुळे तिवारी यांचा विश्वास बसल्याने त्यांनी व्यवसाय करण्यास सुकेशिनीला होकार दिला होकार मिळाल्यानंतर सुकेशिनीने तिवारी यांना पैसे भरण्याकरिता अकाऊंट नंबर दिले. त्यानुसार तिवारी यांनी वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये तब्बल ६७ लाख रूपयांचा भरणा केला. रकमेचा भरणा केल्यानंतर तिकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही़ त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कैलास तिवारी यांनी २० मे रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आपली प्रतिक्रिया द्या