अॅमस्टरडॅमचं नाइट लाइफ

  • द्वारकानाथ संझगिरी

‘नाइट लाइफ’ या शब्दात पाश्चात्त्य देशात रात्रीचं पॅरिस पाहत आयफेल टॉवरच्या वरच्या मजल्यावरच्या रेस्टॉरंटमध्ये मद्य पीत जेवणापासून लंडनमधल्या सोहोतल्या भुयारी नाइट क्लबपर्यंत सर्व येतं. शहराच्या किंवा हॉटेलच्या ब्रोशर्समध्ये नाइट लाइफचं रसभरीत वर्णन अधिकृतपणे केलेलं असतं. अॅमस्टरडॅम हे शहर तर त्याचं ‘नाइट लाइफ’ मिरवतं. ‘‘चला, अॅमस्टरडॅमचं नाइट लाइफ पाहायला चला’’ अशी कंडक्टेड टूर मी तिथे पाहिली आणि सद्गदित होऊन अॅमस्टरडॅम नगरीला हात जोडले. ‘‘आमच्या इथलं चीज चाखून पहा’ असं डच मंडळी ज्या प्रेमाने सांगतात त्याच प्रेमाने ‘‘आमच्या लाल बत्ती विभागाला फेरी मारायला विसरू नका’’ असे सांगतात. तुम्हाला खोटं वाटेल, पण पहिल्याच दौऱ्यात तिथल्या कालव्यांचं रात्रीच्या प्रकाशातलं सौंदर्य डोळ्यांनी घटाघटा पिण्यासाठी आम्ही (मी आणि माझा एक मित्र) कालव्यांची टूर घेतली. वाइन आणि चीज प्रेमाने आम्हाला भरवलं जात होतं. त्यावेळी ‘कोलेस्टेरॉल’ हा शब्द  कानावरून न गेल्यामुळे चीज भरपूर पोटात जात होतं. ही नगरी आपण पद्मिनीप्रमाणे तिच्या कालव्यातल्या पाण्याच्या प्रतिबिंबातून पाहू शकतो. या पद्मिनीच्या सौंदर्याची एक वेगळीच नशा डोळ्यात असते. त्यात वाइनची भर पडते. पोटात चीज असल्यामुळे वाइनचे एखाद्दोन जास्त ग्लास पोटात जातात. अशा परिस्थितीत सर्वजण असताना आमची महिला गाइड अचानक म्हणाली, ‘‘समस्त पुरुषांनो, आता डाव्या बाजूला लक्ष द्या. हा आमचा रेड लाइट एरिया. तिथल्या एवढ्या सुंदर मुली जगात कुठे सापडणार नाही.’’ एक महिला चक्क वेश्याव्यवसायाचं तोंडभरून कौतुक करीत होती.

राणीच्या पॅलेसचं वर्णन ज्या कौतुकानं केलं त्याच कौतुकाने तिने या ‘रातराण्यां’च्या छोट्या छोट्या खोल्यांचं केलं. त्यांना ‘कॅण्डललिट ब्युवरीज’ का म्हणतात ते समजावलं.  समस्त पुरुषांची पद्मिनीसारख्या वाटणाऱ्या नगरीची आणि रक्तवारुणीची (रेड वाईन) नशा खाडकन उतरली. काही क्षणापूर्वी बोटीतून उतरूच नये असं वाटत होतं. अचानक पुरुषांना किनाऱ्याची आस लागली. बोटीतून उतरल्यावर समस्त पुरुषवर्ग ‘त्या विभागा’ची चौकशी करायला लागला. काचेच्या कपाटासारख्या छोट्या केबिनमध्ये त्या मुली खूर्ची टाकून वाचत किंवा सिगारेट ओढत बसलेल्या असतात. प्रक्षोभक अंगविक्षेप नाही की गलिच्छ आरडाओरड नाही. केबिनमध्ये दिवा नव्हता. तिथे मंद तेवणारी मेणबत्ती होती. तिच्या प्रकाशात त्या मुली गोऱ्या बाहुल्या बसवल्याप्रमाणे वाटतात. शहाणा पुरुष तिथे विण्डो शॉपिंगसाठी जातो. मी आणि माझा मित्र आम्ही शहाण्यांत मोडत होतो. मी ऍमस्टरडॅमला तीनदा गेलोय त्यामागे कॅण्डललिट ब्युवरीजचा सुतराम संबंध नाही. एकदा जे ऐकलं होतं ते पाहायला, दुसऱ्यांदा पत्रकारांच्या क्रिकेट टीमबरोबर आणि एकदा मुलाला आणि बायकोला ते शहर दाखवायला. मी पाहिलंय, प्रत्येकाला त्या एरियाचं आकर्षण असतं (म्हणजे मी पुरुषांबद्दल बोलतोय). आमची पंधरा जणांची क्रिकेट टीम इंग्लंड-युरोपात गेली होती तेव्हा ऍमस्टरडॅमला पोहोचेपर्यंत आम्ही प्रचंड थकलो होतो. बाहेर वातावरण थंड होतं. पाऊस रिमझिमत होता. हॉटेल मिळायला वेळ लागला. त्यामुळे सर्वजण म्हणत होते, ‘‘कधी एकदा हॉटेलवर जाऊन झोपतोय असं झालंय.’’ रात्री दहाला प्रत्येक जण चावी घेऊन रूमवर झोपण्याच्या उद्देशाने गेला. नंतर शेजारच्या रूममधला मित्र झोपलाय असं समजून जो तो कॅण्डललिट ब्युवरीज पाहायला गेला आणि अख्खी टीम तिथे एकमेकांना भेटली. सकाळी वेळेवर जे ब्रेकफास्टला आले नाहीत त्यांचे पाय तिथून निघालेच नाहीत हा कयास बांधला गेला. ‘लेटकमर्स’कडे पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर जो तो आदल्या रात्रीच्या खट्याळपणाच्या खुणा शोधत होता. माझ्या तिसऱ्या दौऱ्याच्या वेळी मेणबत्त्यांची जागा निऑन दिव्यांनी घेतली होती. मला वाईट वाटलं. कारण बायकोला कॅण्डललिट ब्युवरीज मी नीट दाखवू शकलो नाही. मेणबत्तीच्या प्रकाशाची मजा निऑन दिव्यात नाही.

मला अॅमस्टरडॅमच्या या लैंगिक पुढारलेपणाचं प्रचंड आश्चर्य वाटतं. तिथे नदीवरच्या पुलाएवढीच चर्चेस दिसतात. कारण कॅथलिक विरुद्ध प्रोटेस्टंट हा वाद डच माणसाच्या रक्तात भिनलाय.  इंग्लंडमध्ये बऱ्याच चर्चचं रूपांतर देवळं, मशिदी, गुरुद्वारात होतंय. कारण ती मंडळी सनातन धर्मापासून दूर जायला लागली आहेत. डच आपल्याप्रमाणेच सनातन धर्माला कवटाळून बसणारे आहेत. माझ्या तिसऱ्या दौऱ्यात मी त्यांच्यात थोडा बदल पाहिला, पण तिथल्या कॅथलिक आणि प्रोटेस्टंट मंडळीमध्ये  एकेकाळी केवढा कट्टरपणा होता. तिथे कॅथलिक म्हणून जन्माला आलेला मुलगा किंवा मुलगी कॅथलिक शाळेत जायची. स्पोर्टस् क्लबही त्याला तोच लागायचा. तो कॅथलिक मुलीवर प्रेम करायचा. आयुष्यभर कॅथलिक वर्तमानपत्र वाचायचा. कॅथलिक पार्टीला मत द्यायचा. कॅथलिक रेडिओ ऐकायचा. साधा ऍपेंडेसायटिस उडवायचा असेल तरी कॅथलिक हॉस्पिटलात जायचा. पोरांनी टाकल्यावर कॅथलिक वृद्धाश्रम शोधायचा आणि शेवटी कॅथलिक स्मशानभूमीत तो चिरनिद्रा घ्यायचा. हे सर्व करताना तो शेजारच्या प्रोटेस्टंटच्या आयुष्यात ढुंकूनही पाहायचा नाही. तीच गोष्ट प्रोटेस्टंट त्याच्या मार्गावरून चालताना करायचा. तर सांगायचा मुद्दा काय, अशा संस्कृतीत ‘ही’ लैंगिक संस्कृती कशी रुजली, टिकली याचं मला नेहमी आश्चर्य वाटलंय. समलिंगी लग्नाला कायदेशीर मान्यता देणारा तो पहिला देश होता.

प्रत्येक लाल बत्ती विभाग हे प्रेक्षणीय स्थळ नसतं. एकदा माझ्या काही परदेशी क्रिकेटपटू मित्रांनी मुंबईचा लाल बत्ती विभाग पाहण्याची इच्छा प्रदर्शित केली. मी त्यांना म्हटलं, ‘‘तो पाहून रोमान्सची ऊर्मी येणार नाही. उलट डिप्रेशन येईल.’’ त्यांच्या तीन गाड्या, माझी एक गाडी आणि आमच्या मागे पोलिसांची गाडी अशी ती मोटरकेड  होती. पोलिसांचं प्रोटेक्शन मीच घेतलं. मला काही गडबड होऊन तो बातमीचा विषय व्हायला नको होता. अर्थात ते चॅनेल्सचे दिवस नव्हते. त्यामुळे ‘फट’ म्हटलं की ब्रह्महत्या होत नव्हती. ते पाहून झाल्यावर आम्ही सर्व सुखरूप ‘ताज’ हॉटेलवर पोहोचलो. ते सर्व शहारले होते, पण ती वेश्यांची दयनीय अवस्था पाहून त्यांना त्यांची घरं पिंजऱ्यासारखी भासली आणि त्यात उभ्या असलेल्या त्या असहाय्य वाटल्या. हृदय हेलावणारं ते दृश्य होतं. अशाच एका हृदय हेलावणाऱ्या दृश्यातून ऑस्ट्रेलियन स्टीव्ह वॉतला समाजसेवक जागा झाला होता. त्याला वेश्यांच्या दोन मुलींच्या जागी स्वतःच्या दोन मुली दिसायला लागल्या होत्या आणि त्याने त्यांच्यासाठी आपल्या खिशात हात घातला. दुसऱ्याच्या खिशात हात घालून समाजसेवा  करणारे अनेक असतात, पण त्याने आधी स्वतःच्या खिशात हात घातला, पण स्वच्छ, सुंदर असो किंवा अस्वच्छ असो, अशा विभागात गुन्हेगारी पाय रोवून उभी असते. एक किस्सा सांगतो.

१९९६ ची गोष्ट आहे. माझा एक शिवाजी पार्कीय मित्र मला इंग्लंडला भेटला. तो लॉर्डस् कसोटी सामना पाहायला आला होता. त्याला बेटिंगचा प्रचंड नाद होता. त्या कसोटीआधी तिथे फिरताना एका बेटिंग डेनमध्ये तो शिरला. या कसोटीत कोण कोण शतक करील यावर बेटिंग सुरू होतं. त्याने कुणावर पैसे लावले असतील? त्याने त्या कसोटीत कसोटी पदार्पण करणाऱ्या सौरभ गांगुलीवर पैसे लावले. त्यावेळी गांगुली पळपुट्या म्हणून प्रसिद्ध होता. काय नशीब असतं पहा, गांगुलीनं शतक ठोकलं. त्याला दहा पौंडांवर सहाशे पौंड मिळाले. गांगुलीलाही विचारलं असतं तर त्याने स्वतःवर पैसे लावू दिले नसते. ते पैसे घेऊन त्याला रात्रीचं लंडन पाहायची इच्छा झाली. पबमध्ये मी वाइनचा एक ग्लास पुरवून पुरवून पिताना त्याने दोन स्कॉचचे पेग रिचवले. ‘चिकिटो’ नावाच्या मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये (पिकॅडलीजवळ) मार्गरिटा घेऊन जेवण झालं. मग जवळच्या सोहो स्ट्रीटवरच्या एका नाइट क्लबच्या भुयारात आम्ही शिरलो. एका अत्यंत देखण्या मदनिकेला त्याने ‘मद्य घेणार का?’ विचारलं आणि फसला. ती मद्य घेत होती की कोक ते मला शेवटपर्यंत कळलं नाही. कारण तिच्यावर मद्याचा परिणाम दिसत नव्हता. तिच्या चार पेगमध्ये त्याने कसेबसे दोन संपवले. तिने दयाबुद्धीने त्याच्यावर उपकाराचं ओझं टाकत एक चुंबन त्या मित्राला दिलं. एक चुंबन आणि तिच्या चार पेगचं बिल मित्राला दोनशे पौंड आले. तो चरफडला, पण समोरच्या काळ्या बाऊन्सरच्या डोळ्यातली जरब पाहून त्याने मुकाट्याने खिशात हात घातला. त्या दिवशी मीही एक धडा शिकलो. परदेशात मद्य स्वतः प्यावे, स्त्रीदाक्षिण्य दाखवू नये!

dsanzgiri@hotmail.com