
दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या वुमेन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंनी इतिहास रचला. या स्पर्धेत खेळाडू निखत जरीन हिने हिंदुस्थानला तिसरे सुवर्ण पदक प्राप्त करून दिले. जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन वेळा सुवर्ण पदक जिंकणारी निखत ही दुसरी हिंदुस्थानी महिला बॉक्सर आहे.
दिल्लीत झालेल्या अंतिम सामन्यात निखत जरीनने व्हिएतनामच्या गुयेन थी टॅमचा पराभव केला. 50 किलो गटाच्या अंतिम सामन्यात निखत जरीनने व्हिएतनामच्या गुयेन थी टॅमचा 5-0 असा पराभव केला. 26 वर्षीय निखत जरीनने गेल्या वर्षीही जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक जिंकले होते.
शनिवारी, 25 मार्च रोजी दोन हिंदुस्थानी बॉक्सर खेळाडू सुवर्ण पदक जिंकण्यात यशस्वी ठरले. कॉमनवेल्थ गेम्स 2022 ची सुवर्णपदक विजेती नीतू घंघासने 48 किलो वजनी गटात आणि अनुभवी बॉक्सर स्वीटी बुराने 81 किलो वजनी गटात सुवर्ण यश मिळविले. नीतूने चमकदार कामगिरी करताना अंतिम सामन्यात मंगोलियाच्या लुत्सायखान अल्तानसेतसेगचा
5-0 असा पराभव केला. त्याचवेळी 30 वर्षीय स्वीटीने लाइट हेवीवेट प्रकारात चीनच्या वांग लीनाचे आव्हान मोडून काढत 4-3 असा विजय मिळवला. मेरी कोमने या स्पर्धेत विक्रमी 6 वेळा (2002, 2005, 2006, 2008, 2010 आणि 2018) सुवर्णपदक जिंकले आहे. सरिता देवी (2006), जेनी आरएल (2006), लेखा केसी (2006), नीतू घनघास (2023) आणि स्वीटी बुरा (2023) या महिलाही हिंदुस्थानी बॉक्सर असून त्यांनीही या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहेत.