शिट्टी

शिबानी जोशी,meme@gmail.com

आपल्याकडे शिट्टी वाजवणे हे मवालीपणाचे किंवा टपोरीगिरीचे लक्षण मानले आहे. शीळ वाजवणे हे चांगलं लक्षण मानलं जात नाही. तिन्हीसांजा झाल्यावर तर शिट्टी घातली की, पूर्वी आजीचा ओरडा खावा लागत असे, पण हीच लहानपणीची शिट्टी वाजवण्याची सवय निखिल राणे या ताडदेवच्या शिट्टी-बहाद्दराला जागतिक पातळीवरचा प्रथम पुरस्कार देऊन गेली आहे.

लहानपणापासून निखिलला शीळ घालायला आवडायची व जमायचीसुद्धा. बी.कॉमचं शिक्षण घेता घेता निखिलनं त्याचं पॅशन सुरू ठेवलं. शास्त्रीय संगीतही त्यानं आत्मसात केलं. शिवाय म्युझिकचा अमर मोहिलेंच्या मार्गदर्शनाखाली कोर्सही पूर्ण केला. कारण शिट्टी हा पण स्वर आहे. स्वर व सूर हे शिट्टीचा प्राण आहेत. त्यामुळे निखिलने त्याचा उपयोग शीळ घालण्यासाठी करून घेतला. शिवाय एखादी कला आपण शिकतो तेव्हा आपल्याला गुरू मिळतो, पण इथे तेही शक्य नव्हतं. कारण आधीच शिट्टीला प्रतिष्ठा नाही. ती शिकवणार कोण? मग एकलव्यासारखं शीळ वाजवण्याची तयारी निखिल करत असे. २०१५ च्या सुमारास त्याला शीळ वादनाचं जागतिक कन्व्हेंशन होत असतं आणि त्यात विविध स्पर्धा घेतल्या जातात अशी माहिती मिळाली आणि त्यानं त्या आधारावर तिथे अर्ज केला. त्याला ऑडिशन पाठवायला सांगितलं गेलं. त्यात त्याचं सिलेक्शन झाले आणि जपानला होणाऱया या स्पर्धेसाठी तो पालक, मित्र यांच्या सहकाऱयांच्या बळावर तिथे पोचला. ‘वर्ल्ड व्हिसलिंग कन्वेन्शन २०१८  ही स्पर्धा ३ ते ५ मे दरम्यान झाली. यात १२ देशांतील स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत ३ कॅटेगरी असतात. एक शिट्टी वाजवून त्यासह वाद्य वाजवणे-ज्याला हिकीवुकी असं म्हटलं जातं- त्यात निखिलने पहिला क्रमांक मिळवला. दुसऱया प्रकारामध्ये शिट्टी वाजवून अभिनय किंवा नृत्य करायचा असतो व तिसऱया प्रकारात कराओके ट्रकवर शिट्टी वाजवायची असते, ज्याला अकम्पनी म्हटलं जातं. अशा प्रकारची ही स्पर्धा १९७२ पासून म्हणजे ४६ वर्षे घेतली जात आहे. ही स्पर्धा अमेरिकेतल्या एलेन दे हार्ड या शीळप्रेमींनी सुरू केली. ही स्पर्धा जपान, कोरिया, चीन, लुईसबर्ग अशा विविध देशांत तर दोन वर्षांनी घेतली जाते. अशा वेगळय़ा प्रकारच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याचा निखिलला मनापासून अभिमान वाटतो आणि त्याने हा पुरस्कार कुटुंबीय, हितचिंतक तसेच देशाला समर्पित केला आहे.

निखिलचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे निखिल तोंड न हलवता शिट्टी वाजवतो आणि अशा प्रकारे शिट्टी वाजवणारा तो देशातला पहिलाच वादक ठरला आहे. निखिलने या स्पर्धेत आर. डी. बर्मन ‘शोले’ चित्रपटातील ‘महबुबा महबुबा’ हे गीतं शिट्टी वाजवून व त्याबरोबर खंजिरी, घुंगरूसारखी वाद्य वाजवून सादर केलं. ‘शोले’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेला चित्रपट आधीच अनेक रेकॉर्ड मोडत आहे. त्यात त्यातल्या जादुई संगीताची मोहिनी शीळवादकाला पडून त्यावर त्यानं जागतिक पातळीवरचं बक्षीस ही जिंकलंय.

२०१६ मध्ये पण निखिलला या स्पर्धेत पारितोषिक मिळाल्यानंतर त्याला शिट्टी वादनाचे शोज पण मिळू लागले. आपल्याकडे शिट्टी वादनाला दर्जा नाही, पण आता जागतिक पातळीवर स्पर्धा जिंकल्यानंतर लोकमत नक्कीच बदलत आहे आणि त्यामुळे नवनवीन मुलांना शिट्टी वादन शिकवायची इच्छा आहे. या कलेबद्दल लोकांना अवेअर करणं, मुलांना नवीन क्षेत्र निर्माण करून देणं हे आपलं पुढचं ध्येय असणार आहे असं निखिल सांगतो.