शिवसेना व सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी : नीलम गोऱ्हे

286

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवसेना व सरकार नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी आहे. त्यांना भरपाई देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. कृषी खात्याकडूनही शेतकऱ्यांना आर्थिक आणि अवजारांच्या स्वरूपात नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे केली आहे.

कराड येथील शासकीय विश्रामगृहात नीलम गोऱ्हे व कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची सोमवारी दुपारी भेट झाली. यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी ही मागणी केली आहे. आमदार आनंदराव पाटील, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आमदार आनंदराव पाटील यांनी नीलम गोऱ्हे व कृषिमंत्री अनिल बोंडे यांना कराड तालुक्यातील पीक नुकसान व घरांचे झालेले नुकसान याबाबत माहिती दिली. तर कृषी अधिकारी यांनी कराड तालुक्यात एकूण शेती क्षेत्रापैकी झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागामार्फत युद्धपातळीवर करण्याचे काम सुरू असून आतापर्यंत 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या