मनसेकडून निवडणूक लढवलेल्याला चोरीच्या आरोपाखाली अटक

12666

मनसेकडून 2017 ची मुंबई महापालिका निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. जवळपास 20 वर्षांपूर्वी त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर त्याने एखाद दोन सुनावण्यांचे अपवाद वगळता इतरवेळी सुनावणीसाठी हजर राहणं सोडून दिलं होतं. त्यामुळे न्यायालयाने वॉरंटही जारी केलं होतं. अनेक वर्ष पोलिसांना त्याने गुंगारा दिला खरा, मात्र राजकारणात उतरण्याच्या त्याच्या इच्छेने त्याला अडचणीत आणसं

ओशिवरा मुंबई पोलिसांनी निलेश मुद्राळे याला अटक केली आहे. मुद्राळेवर जवळपास वीस वर्षांपूर्वी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्याला न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहणं गरजेचं होतं. शाळादेखील पूर्ण न केलेल्या मुद्राळेला पोलिसांनी मंगळवारी दिंडोशीमधून अटक केली. मुद्राळे याचा चोरीच्या आरोपाखाली 1995 साली अटक करण्यात आली होती. एक दोन सुनावण्यांसाठी हजर राहिलेल्या मुद्राळेने नंतर न्यायालयात जाणं बंद केलं होतं. पोलिसांनी तेव्हा जोगेश्वरी पश्चिमेकडील त्याच्या घरात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना मुद्राळे सापडला नाही. मुद्राळे दिंडोशीमध्ये असल्याचं पोलिसांना कळालं होतं, मात्र ते त्याच्यापर्यंत पोहचू शकले नव्हते.

मुद्राळे याने दोनवेळा म्हणजे  2012 आणि 2017 या वर्षी महापालिका निवडणूक लढवली होती असं पोलिसांना कळालं होतं. मुद्राळे याच्याविरोधात 2008 आणि 2010 साली दगंल भडकावणे आणि मारामारी करण्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यातला एक गुन्हा दिंडोशी पोलिसांत तर दुसरा गुन्हा समता नगर पोलिसांत दाखल करण्यात आलेला आहे असं टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.

मुद्राळेने निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून पोलिसांना त्याच्याबाबत पत्त्यासह बरीच माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला शोधून काढला. न्यायालयाने मुद्राळेला न्यायालयात हजर राहण्याबाबत आदेश दिला होता. तरीही तो न्यायालयात हजर न झाल्याने त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या