चेंबूरमध्ये भीषण सिलिंडर स्फोटात नऊजण जखमी

चेंबूर सी.जी. गिडवाणी रोडवरील गोल्फ क्लबजवळील एकमजली घरात आज सकाळी झालेल्या सिलिंडर स्पोटात नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यावेळी सिलिंडर स्पह्टाने अवघ्या परिसरात प्रचंड घबराट पसरली. यामधील जखमींमधील आठ जण 60 ते 65 टक्के भाजले असल्यामुळे त्यांना ऐरोलीच्या बर्न रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

चेंबूर परिसरातील स्मोक हिल सलूनच्या मागे, गोल्फ क्लब जवळच्या गिडवाणी मार्गावर सकाळी 7.33 वाजता एका घरात गॅस सिलिंरचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, बाजूच्या घराच्या, वाहनांच्या काचा फुटल्या. बाजूच्या वसाहतींमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य हाती घेतले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या नऊ जणांना तत्काळ गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमींना नंतर ऐरोलीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती गोवंडी शताब्दी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुनील पाकळे यांनी दिली. दरम्यान, या घटनेची पोलीस, अग्निशमन दल तसेच संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

ऐरोली बर्न रुग्णालयात दाखल जखमी

अजय लिंबाजिया (33), नितीन लिंबाजिया (55),  पियूष लिंबाजिया (55), ज्योत्स्ना लिंबाजिया (53), प्रीती लिंबाजिया (34), पूनम लिंबाजिया (35), मेहक लिंबाजिया (11), ओम लिंबाजिया (9 शीव रुग्णालयात दाखल जखमी), सुदाम शिरसाट (55)