नववीतील विद्यार्थ्याने रचला अपहरणाचा बनाव

64

मित्रांना पार्टी देण्यासाठी केला प्रताप

पुणे – गेल्या काही दिवसांपासून शाळेतील मित्र रोज एकजण याप्रमाणे मस्त पार्ट्या करीत होते… आज एका मुलावर ही पाळी आली… पण त्याच्याकडे पैसे नव्हते.. त्याने थेट स्वत:चे अपहरण झाल्याचा बनाव रचला… लवकर दीड लाख रुपये पाठवा असा मेसेज केला… घाबरलेले वडील काही वेळातच पोलीस ठाण्यात आले… त्यांनी पोलिसांना कैफियत सांगताच, त्यांनी गांभीर्याने तपास सुरू केला… शेवटी मोबाईल ट्रेस करून अडीच तासांत अपहरणकर्त्याला पकडले… पण त्याच मुलाने मेसेज करून त्याने पार्टीसाठी पैसे मागितल्याचे समोर आले… त्यामुळे पोलिसांसह पालकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.
ही घटना आहे खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील. या मुलाचे वडील पीएमपीएल, एसटी बससाठी टायर पुरवठा करणारे मोठे ठेकेदार आहेत. हा मुलगा भवानी पेठेतील विजय वल्लभ शाळेत नववीमध्ये शिकत आहे. त्याच्या वर्गातील सहा ते सातजणांचा ग्रुप गेल्या २२ दिवसांपासून शाळा बुडवून पार्टी करीत होते. रोज किमान २ ते ३ हजार रुपये पार्टीसाठी उडवत होते.

शुक्रवारी या मुलाला आपल्या मित्रांना पार्टी द्यायची होती; पण त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने त्याच्या मोबाईलवरून वडिलांना ‘आम्ही तुमच्या मुलाचे अपहरण केले आहे, त्वरित दीड लाख रुपये पाठवा’ असा मेसेज केला. घाबरलेल्या वडिलांनी त्वरित खडक पोलीस ठाणे गाठून याची माहिती दिली. वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव, उपनिरीक्षक अनंत व्यवहारे, शिवाजी देवकर, गुरू नाईक, विजय कांबळे, राजन शिंदे, सर्फराज शेख, महेंद्र पवार, अनिकेत बाबर, महेश बारावकर, महेश कांबळे यांच्या पथकाने गांभीर्याने तपास सुरू केला.

पोलिसांनी मोबाईलचे टॉवर लोकेशन पर्वती, तळजाई भागात दाखवत होते. काही वेळाने पेटीएमवर एक हजार रुपये पाठवून द्या, असा मेसेज त्याने त्याच्या भावाच्या मोबाईलवर केला. तोपर्यंत पोलिसांनी तळजाई, पर्वती भागात शोध सुरू केला होता. त्यांना एकजण शाळेचे दप्तर घेऊन फिरताना दिसला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने अपहरण झालेला मुलगा मीच आहे, असे सांगितले. त्याच्या दप्तरामध्ये शाळेचा ड्रेसही सापडला. पोलिसांनी विश्‍वासात घेऊन चौकशी केल्यानंतर मित्रांना पार्टी देण्यासाठी हा उद्योग केल्याचे सांगितले.

शाळेचेही विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष
– विजय वल्लभ शाळेतील ही मुले गेल्या २२ दिवसांपासून शाळा बुडवत होते; परंतु शाळेने पालकांना याबाबत माहिती दिली नसल्याने त्यांचेही दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. पालकांनी आपला मुलगा शाळेत जातो का? मित्र कोण आहेत? मोबाईलचा वापर कसा करतो? याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या