ऐन उन्हाळ्यात थंडीचा कडाका, निफाड, मानूरचा पारा ७ अंशावर

56

सामना ऑनलाईन । नाशिक

मार्च महिना म्हटला की कडकडीत उन्हाळा असतो, मात्र वातावरणात कमालीचा बदल झाल्याने दोन दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात थंडी जाणवत आहे. आज सोमवारी निफाड आणि कळवण तालुक्यातील मानूर येथे किमान ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये १० अंशावर पारा घसरला. हवामानातील हा बदल आजारांना निमंत्रण देणारा ठरल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

यावर्षी फेब्रुवारी अखेरपासूनच रणरणते ऊन होते. नाशिक शहरात एक मार्चला कमाल तापमान ३६.४ अंशांवर पोहोचले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून कमाल व किमान दोन्ही तापमानात मोठी घट झाली आहे. गेल्या बारा दिवसात नाशिकचे कमाल तापमान ३६ अंशावरून 29 अंशांवर, किमान तापमान १६  वरून १० अंशांवर घसरले आहे. यापूर्वी मार्च २०१४ मध्ये किमान तापमान ९ अंश इतके नोंदविले गेले होते. तीन वर्षांनंतर यंदा पुन्हा उन्हाळ्याच्या दिवसात थंडीचा अनुभव येत आहे. वाऱयाचा वेग जास्त असल्याने दिवसाही गारवा जाणवतो आहे.

निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात रविवारी ८.४, तर आज ७ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. कळवण तालुक्यातील मानूर येथे काल व आज ७ अंशावर पारा स्थिर होता. मात्र, ही थंडी लवकरच ओसरेल, पुन्हा उन्हाच्या झळा जाणवतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या