‘बुरगुंडा’ पुन्हा गावोगावी नेणार! दिवंगत भारुडरत्न निरंजन भाकरे यांच्या मुलाने केला निर्धार

बुरगुंडा भारूडाने महाराष्ट्र गाजवून सोडणारे भारूडरत्न निरंजन भाकरे यांचे 23 एप्रिल रोजी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर लोककलेचा वारसा आता निरंजन भाकरे यांचा मुलगा शेखर भाकरे चालवणार आहे. वडिलांच्या धक्क्यातून सावरत, साथीदारांची मोट बांधत शेखर यांनी भारुडाची तयारी केली आहे. ‘‘भारूड यापूर्वी कधी थांबले नाही आणि यानंतरही कधी थांबणार नाही. बुरगुंडा गावोगावी नेणार,’’ असा निर्धार त्यांनी केला आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊन लागले आणि लोककलावंतांची परवड सुरू झाली. लोककलेचे कार्यक्रम थांबल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे निरंजन भाकरे यांनी उदरनिर्वाहासाठी मुलाला व्यवसाय सुरू करून दिला. मात्र आता वडिलांच्या पश्चात शेखर यांनी पुन्हा लोककलेकडे वळायचे ठरवले आहे.

‘‘मी भारुडापासून दूर चाललो होतो. तसं बघितलं तर मी अण्णांना सहकार्य करायचो. त्यांच्यासोबत कार्यक्रमाला जायचो. सिंथेसायझर, किबोर्ड, हार्मेनियम अशी साथसंगत करायचो. पण माईकसमोर उभं राहण्याचं धाडस झालं नाही. वडिलांचा आधार असायचा. मात्र आता भारूड सुरू करायचंय. भारुडाचे कार्यक्रम मी थांबू देणार नाही,’’ असे शेखर यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.

भारूड थांबले तर कसं होणार… भारूड कायम राहिले पाहिजे. भाकरे नावाच्या माध्यमातून ते सुरू राहिले पाहिजे. वडिलांनी केलेली भारुडं तसंच त्यात आणखी काय नावीन्यता आणता येईल, यादृष्टीने मी अभ्यास सुरू केलाय. त्यातून समाजप्रबोधनाचा कसा पुढे न्यायचा आहे, असे शेखर म्हणाले. भारूडरत्न निरंजन भाकरे कलापथक मंडळामध्ये 8 ते 10 जण आहेत. त्यांच्या साथीने भारूड पुन्हा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या