नीरव मोदीचा भाऊ ५० किलो सोनं घेऊन फरार

29

सामना ऑनलाईन। अबुधाबी

पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांहून अधिकचा चुना लावून परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचा सावत्र भाऊ नेहालने भावाच्याच पावलावर पाऊल ठेवलं आहे. पीएनबी घोटाळा प्रकरणी सीबआयने गुन्हा दाखल केल्यानंतर नेहालने दुबईतील त्याच्या बँक लॉकरमधून ५० किलो सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. लंपास केलेलं सोनं नीरवचं असून विक्रीसाठी ते बँकेत ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंबंधी दिलेल्या माहितीनुसार, पीएनबी घोटाळा समोर आल्यानंतर तपास यंत्रणा बँकेतील सोनं काढण्यास अडथळे आणू शकतात, या भीतीने सावध झालेल्या नेहालने दुबईच्या बँकेत ठेवलेले सोन्याचे ५० किलो वजनाचे दागिने आधीच लॉकरमधून काढले. नेहाल अमेरिकेत राहत असून मेहूल चोक्सीच्या गीतांजली जेम्स फर्मसाठी काम करतो. पीएनबी घोटाळाप्रकरणात सीबीआयने अद्यापपर्यंत आरोपपत्रात नेहालचे नाव नमूद केले नव्हते. मात्र, या घोटाळ्यात नेहालने महत्वाची भूमिका बजावल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

गुरुवारी ईडीने पीएनबी घोटाळा प्रकरणी नीरव मोदी व त्याच्या साथीदारांविरोधात पहिले आरोपत्र दाखल केले. १२०० पानांच्या या आरोपपत्रात मनी लॉन्ड्रिग कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या आरोपपत्रात २४ जणांची नावे दिली आहेत, त्यात नेहालचाही समावेश आहे. दरम्यान, नीरव मोदीचा मामा मेहूल चोक्सीनेही दुबईतील बँक लॉकरमधून सोनं व हिरे हटवण्याची तयारी केली होती. पण ईडीने त्याच्या मनसुब्यावर पाणी फिरवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या