‘निर्भया’च्या आरोपींना भर चौकात फाशी द्या, कंगना रणौतची संतप्त प्रतिक्रिया

672
kangana

अभिनेत्री कंगना रणौत आपल्या अभिनयासोबतच वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत असते. यावेळी कंगनाने आपला निशाणा दिल्लीतील ‘निर्भया’ सामूहिक बलात्कार आणि खूनाच्या दोषींवर साधला आहे. “या लोकांना सर्वांसमोर फासावर लटकवलं पाहिजे”, अशा भावना कंगनाने व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री कंगना मुंबईत तिच्या ‘पंगा’ सिनेमाच्या प्रिमिअर दरम्यान झालेल्या एका पत्रकार परिषदेत बोलत होती. ‘पंगा’ हा सिनेमा 24 जानेवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

बलात्कारासारखा गुन्हा करणारे अल्पवयीन कसे?

मुंबईत बुधवारी संध्याकाळी ‘पंगा’ सिनेमाच्या प्रिमिअर दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत कंगना दिल्ली सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या आरोपींवर बोलत होती. दिल्ली सामूहिक बलात्कारातील एक आरोपी अल्पवयीन होता. ‘जो अल्पवयीन मुलगा बलात्कारासारखा गुन्हा करू शकतो, त्याला अल्पवयीन का म्हणता?’, असा सवाल करतानाच ‘जी व्यक्ती बलात्कारासारखा गुन्हा करू शकते, ती व्यक्ती अल्पवयीन असूच शकत नाही. अशांना भर चौकात फाशी दिली पाहिजे’, असे मत कंगनाने व्यक्त केले.

ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी निर्भयाच्या आईला केलेल्या विनंती संदर्भातदेखील कंगनाने आपली भूमिका अगदी कडक शब्दात मांडली आहे. ‘बलात्काऱ्यांना माफी द्या अशी विनंती करणाऱ्या महिलेला देखील या दोषींच्या सोबत तुरुंगात चार दिवस ठेवा. त्यांना तिथेचं ठेवलं पाहिजे, ज्यांना अशा लोकांची दया येते. अशाच महिला गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना जन्म देतात’, असं कंगना म्हणाली.

दिल्ली सामूहिक बलात्कारातील आरोपींना फेब्रुवारीत फाशी

दिल्ली पतियाळा हाऊस कोर्टाने निर्भया प्रकरणातील चारही आरोपींच्या विरोधात डेथ वाँरंट जारी केले आहे. या आरोपींना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या