निर्भयाच्या मारेकऱ्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

625
mukesh-singh-nirbhaya

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. निर्भया प्रकरणातील दोषी मुकेशकडून कोणतेही पुरावे किंवा प्रासंगिक दस्तऐवज राष्ट्रपतींकडे देण्यात आलेले नाहीत, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. त्यामुळे आता निर्भयाच्या मारेकऱ्यांना 1 फेब्रुवारी रोजी फाशी निश्चित मानली जात आहे.

मंगळवारी मुकेशच्या वकील अंजना प्रकाश यांनी सांगितले होते की राष्ट्रपतींसमोर योग्य कागदपत्र ठेवण्यात आले नव्हते, त्यामुळे दयायाचिका फेटाळण्यावर सर्वोच्च न्यायालयाने पुर्नविचार करणे आवश्यक आहे. तसेच आपल्या याचिकेत मुकेशने तुरुंगात त्याच्यासोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे तसेच त्याचा भाऊ राम सिंह याची हत्या करण्यात आल्याचेही म्हटले होते.

या प्रकरणात बुधवारी निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, ‘राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलेले सर्व कागदपत्र आम्ही तपासले असून कागदपत्रांच्या योग्यते संदर्भात समाधानी आहोत. गृह मंत्रालयाने सर्व कागदपत्र पाठवले होते. मुकेशच्या याचिकेता कोणतेही तथ्य वाटत नाही. तुरुंगात लैंगिक शोषण झाल्यासंदर्भात पुरावे नाही, त्यामुळे दया याचिकेशी त्याला जोडता येणार नाही.’ त्यानंतर आपण ही याचिका रद्द करत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर निर्भयाच्या आईने सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानत निर्भयाला आता नक्की न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. गुन्हेगार कायद्याचा दुरूपयोग करू पाहताहेत. पण मुकेशची याचिका फेटाळून लावल्याने आता 1 फेब्रवारी रोजी त्यांनी फाशी होईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

आपली प्रतिक्रिया द्या