ठरलं! 3 मार्चला निर्भयाच्या नराधमांना फासावर लटकवणार

2634

‘निर्भया’वरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार नराधम दोषींना फासावर लटकविण्याची तारीख अखेर ठरली आहे. 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता तिहार कारागृहात फाशी देण्यात येणार आहे. यासंबंधी पटियाला हाऊस कोर्टाने डेथ वॉरंट जारी केले आहे.

पटियाला हाऊस कोर्टाने डेथ वॉरंट जारी करण्याची ही तिसरी वेळ आहे. कायदेशीर आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे यापूर्वी दोन वेळा नराधमांची फाशी पुढे ढकलली गेली होती. नराधम आरोपींकडून फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी कायदेशीर पळवाटा शोधण्याचा प्रयत्न झाला. पहिल्यांदा 22 जानेवारीला फाशी देण्यात येणार होती. त्यानंतर 1 फेब्रुवारीची तारीख निश्चित केली होती. मात्र, आता सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, 3 मार्चला सकाळी 6 वाजता फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे आता नराधम दोषी मुकेशकुमार सिंह, पवन गुप्ता, विनयकुमार शर्मा आणि अक्षय कुमार या चौघांना एकाच वेळेस फासावर लटकविले जाणार आहे.

दोषींचे वकील म्हणाले अजूनही पर्याय आहे

पटियाला हाऊस कोर्टाने तिसऱयांदा डेथ वॉरंट जारी केल्यानंतरही नराधम दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी आपल्याकडे अजूनही पर्याय आहे, असा दावा केला. अक्षय कुमारसाठी ते नवीन दया याचिका करणार आहेत. तर पवन गुप्तासाठी राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठविण्याची तयारी वकिलांनी सुरू केली आहे.

आतातरी फासावर लटकवतील अशी आशा आहे – निर्भयाची आई

तिसऱयांदा डेथ वॉरंट निघाले आहे. चार नराधमांना आतातरी 3 मार्चला फासावर लटकविले जाईल, माझ्या लेकीला न्याय मिळेल अशी आशा आहे, असे निर्भयाच्या आईने सांगितले. दरम्यान, निर्भया प्रकरणाला सात वर्षे झाली. न्यायालयाचे आता ‘तारीख पे तारीख’ नको. नराधमांना लवकर फाशी द्या, अशी देशभरात भावना आहे.

आपली प्रतिक्रिया द्या