#Nirbhaya निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण

1603

दिल्ली सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील दोषींची फाशी पुन्हा एकदा टळण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्यानंतर दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने दोषींविरोधात नव्याने डेथ वॉरंट जारी केले. या डेथ वॉरंटनुसार दोषींना 1 फेब्रुवारीला तिहार तुरुंगात फाशी देण्यात येणार आहे. मात्र या प्रकरणातील दोषी अक्षय मंगळवारी क्यूरेटिव्ह अर्थात सुधारणा याचिका दाखल केल्याने फाशीची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी अक्षयने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुधारणा याचिका दाखल केली. या याचिकेवर उद्या गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती एन.व्ही. रमन यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी एक वाजता या याचिकेवर सुनावणी होईल. ही याचिका फेटाळली जाण्याचीच शक्यता जास्त आहे.

दुसरीकडे दोषी विनय शर्मा यानेही राष्ट्रपतींकडे दययेसाठी अर्ज केला आहे. याआधी दोषी मुकेशने केलेला दययेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला होता. त्यानंतर न्यायालयाने नव्याने डेथ वॉरंट जारी करत फाशीची तारीख बदलली होती. आता दोषी विनयने दयेसाठी राष्ट्रपतींकडे धाव घेतली आहे. हा दया अर्ज फेटाळण्यात आला तरी नियमानुसार राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळल्यानंतर 14 दिवसांच्या आत दोषींना फाशी देता येत नाही.

तसेच क्यूरेटिव्ह (सुधारणा) याचिका दाखल करणाऱ्या विनयकडेही राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्याचा अंतिम पर्याय आहे. त्यामुळे फाशीला आणखी उशीर होण्याची शक्यता आहे. याआधी न्यायालयात निर्भयाची आई आशा देवी यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील जितेंद्र झा यांनीही फाशीला 70 ते 75 दिवस विलंब होण्याची शक्यता वर्तवली होती. ‘न्यूज 18 लोकमत‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, निर्भयाच्या दोषींना 22 जानेवारीला होणारी फाशीही टळली होती. आता 1 फेब्रुवारीला होणारीही फाशी टळण्याचीच शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या