निर्भया बलात्कार प्रकरण, आरोपी विनयचा स्टेपल पिन गिळण्याचा प्रयत्न

479

निर्भया बलात्कार प्रकरणातील एक आरोपी विनय शर्मा याने पुन्हा एकदा स्वत:ला त्रास करून घ्यायचा प्रयत्न केला. यावेळी त्याने स्टेपल पिन गिळण्याचा प्रयत्न केला. मात्र तुरुंगाच्या अधिकाऱयांनी त्याला वेळीच अडवले. त्यांनी विनयला तत्काळ रुग्णालयात नेऊन उपचार केले. काही दिवसांपूर्वी विनयने भिंतीवर डोके आपटून स्वत:ला जखमी करण्याचा प्रयत्न केला होता.

तुरुंग प्रशासनाने शनिवारी विनय शर्मा आणि अक्षय ठाकूर याच्या कुटुंबीयांना नोटीस पाठवून शेवटची भेट घ्यायला सांगितले आहे. अन्य गुन्हेगार मुकेश सिंह आणि पवनगुप्त यांच्या कुटुंबीयांनी शेवटची भेट 31 जानेवारीला घेतलेली आहे. अक्षय आणि विनयला कुटुंबीयांना शेवटचे कधी भेटणार, याची विचारणा करण्यात आली असल्याचे एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱयाने सांगितले. याशिवाय आठवडय़ातून दोनदा कुटुंबीयांसोबत नियमित भेटी सुरू असल्याची माहिती तुरुंग अधिकाऱयांनी दिली. फाशीचे वॉरंट निघाल्यापासून आरोपी विनय जास्त हिंसक झाला आहे. मात्र त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती स्थिर असल्याचे तुरुंग अधिकाऱयांनी सांगितले.

– मुकेश, अक्षय, विनय आणि पवन या चौघांनाही 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांच्यावर अधिकारी लक्ष ठेवून आहेत. चौघांचे जेवण कमी झाले आहे. 1 मार्चला नवीन डेथ वॉरंट जारी झाल्यानंतर आरोपी विनयच्या वागण्यात बदल झाला आहे. गेल्या वेळी तीन किंवा तीनपेक्षा जास्त कुटुंबातील सदस्यांना भेटण्यास परवानगी देण्यात आली होती, असे ज्येष्ठ तुरुंग अधिकाऱयाने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या