निर्मला सीतारामन संरक्षणमंत्री; सुरेश प्रभूंची रेल्वे सायडिंगला

69
निर्मला सीतारमण (nirmala sitharaman) - हिंदुस्थान

सामना विशेष प्रतिनिधी  । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स परिषदेसाठी चीनला रवाना होण्याआधी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करतानाच त्यात अनेक धक्कादायक बदलही केले. अकार्यक्षमता आणि असमाधानकारक कामगिरीमुळे राजीनामा घेतलेल्या वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांना मोदी यांनी थेट संरक्षण मंत्रीपदावर बढती दिली. तर, सुमार कामगिरीमुळे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची रेल्वे पंतप्रधानांनी अपेक्षेप्रमाणे सायडिंगला लावली. त्यांच्याकडे सीतारामन यांचे वाणिज्य खाते आता देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नवे चेहरे म्हणून आगमन झालेल्या नऊ मंत्र्यांपैकी केवळ आर. के. सिंग आणि अल्फोन्स कन्ननथनम या दोघांकडे स्वतंत्र कार्यभार सोपविण्यात आला आहे. उरलेल्या सात जणांना राज्यमंत्रीपद मिळाले.

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आज सकाळी झालेल्या समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी व डॉ. मुरलीमनोहर जोशी हेदेखील आवर्जून उपस्थित होते.

रेल्वेसोबतच कोळसा खात्याचा अतिरिक्त भारही गोयल यांना पेलावा लागणार आहे. नितीन गडकरींनाही रस्तेविकास व जहाजबांधणीसोबत आता गंगा सफाईचे अतिरिक्त काम पंतप्रधानांनी दिले आहे. कॅबिनेटपदी बढती मिळालेल्या धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पेट्रोलियमसोबतच कौशल्य विकासाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. नरेंद्रसिंग तोमर यांना खाण खाते देण्यात आले आहे. उमा भारतींकडे स्वच्छता व पेयजल मंत्रालय देण्यात आले आहे.

माजी गृहसचिव राहिलेल्या आर. के. सिंग यांच्याकडे ऊर्जा खात्याचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे. क्रीडा राज्यमंत्री विजय गोयल यांची उचलबांगडी करून त्यांना सांख्यिकी व संसदीय कामकाज राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे तर माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांचे प्रमोशन करताना त्यांना क्रीडा व युवक कल्याण खात्याचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे.

राष्ट्रपती खडसावतात तेव्हा…

राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसे नेमस्त गृहस्थ म्हणून ओळखले जातात. मात्र पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हिंदी शब्दाचा चुकीच्या पद्धतीने उच्चार केल्यानंतर राष्ट्रपती कोविंद यांनी प्रधान यांना चांगलेच खडसावले व तो शब्द व्यवस्थित उच्चारण करूनच शपथ दिली. यापूर्वीही कोविंद बिहारचे राज्यपाल असताना उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना शपथ देताना चुकीच्या उच्चारणावरून कोविंदानी तेजस्वी यांनाही असेच फटकारले होते. त्याची आज राष्ट्रपती भवनात पुनरावृत्ती झाली.

पीयूष गोयल नवे रेल्वेमंत्री

निर्मला सीतारामन यांना संरक्षणमंत्रीपद देऊन मोदींनी सर्वांनाच धक्का दिल्याचे मानले जात आहे. इंदिरा गांधींनंतर संरक्षण खाते सांभाळणाऱया त्या दुसऱया महिला असतील.

मंत्रिमंडळाच्या फेरबदलात अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री राजनाथ सिंह या टॉप फोर मंत्र्यांच्या खात्यांना मात्र मोदी यांनी धक्का लावला नाही.

नितीन गडकरींकडे संरक्षण खाते सोपविले जाण्याची दाट शक्यता होती. मात्र आपल्याला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसेल तर रस नसल्याचे गडकरींनी स्पष्टपणे सांगितले होते. त्याचवेळी रेल्वेची धुरा सांभाळण्यासही असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे पीयूष गोयल यांचे प्रमोशन करत त्यांना थेट रेल्वेमंत्रीपद दिले.

कोणाला काय मिळाले?

कॅबिनेट मंत्री

निर्मला सीतारामन – संरक्षण
स्मृती इराणी – माहिती प्रसारण, वस्त्र्ााsद्योग
नरेंद्र तोमर – ग्रामीण विकास, पंचायतराज
सुरेश प्रभू – वाणिज्य आणि उद्योग
पीयूष गोयल – रेल्वे आणि कोळसा
धर्मेंद्र प्रधान – पेट्रोलियम
उमा भारती – पेयजल आणि स्वच्छता
मुख्तार अब्बास नक्वी – अल्पसंख्याक
नितीन गडकरी – रस्ते वाहतूक महामार्ग, नौकानयन, नदी विकास, गंगा शुद्धिकरण
स्वतंत्र कार्यभार
हरदीप पुरी – गृहनिर्माण
अल्फोंस कन्नथनम – पर्यटन
महेश शर्मा – सांस्कृतिक आणि पर्यावरण
आर. के. सिंह – ऊर्जा
राज्यवर्धनसिंह – क्रीडा आणि युवा, माहिती प्रसारण

राज्यमंत्री

शिवप्रताप शुक्ल – अर्थ
अनंतकुमार हेगडे – कौशल्य विकास
अश्विनी चौबे – आरोग्य
वीरेंद्रकुमार – महिला आणि बालविकास
गजेंद्रसिंह शेखावत – कृषी
डॉ. सत्यपाल सिंह – मनुष्यबळ विकास

आपली प्रतिक्रिया द्या