सहा वर्षांत 2838 पाकिस्तानींना दिले हिंदुस्थानचे नागरिकत्व – अर्थमंत्र्यांची माहिती

200

गेल्या सहा वर्षांत 2838 पाकिस्तानींना हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्यात आले. मोदी सरकारच्या काळातील ही आकडेवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी उघड केली. 2016-18 या तीन वर्षांत दोन हजारहून अधिक मुस्लिमांना नागरिकत्व दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील बिगरमुस्लिम शरणार्थींना हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्यासाठी सरकारने सुधारित नागरिकत्व कायदा केला आहे, मात्र याला मुस्लिमांकडून जोरदार विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सीतारामन यांनी रविवारी चेन्नईतील कार्यक्रमात ही आकडेवारी उघड केली. 2014 साली पहिल्यांदा केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारने पुढील सहा वर्षांत 2838 पाकिस्तानींसह अफगाणिस्तानच्या 914 आणि बांगलादेशच्या 172 अशा 3924 शरणार्थींना हिंदुस्थानचे नागरिकत्व दिले. यात मुस्लिमांची संख्या अधिक आहे.

पूर्व पाकिस्तानच्या लोकांचे 60 वर्षे कॅम्पमध्ये वास्तव्य

पूर्व पाकिस्तानातून आलेले लोक 50 ते 60 वर्षे देशातील वेगवेगळ्या कॅम्पमध्ये राहताहेत. त्यांची अवस्था पाहाल तर धक्का बसेल. श्रीलंकन शरणार्थींचीही अशीच अवस्था आहे. हे लोक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले.

  • 2016-18 दरम्यान पाकिस्तानच्या 1595 आणि अफगाणिस्तानच्या 391 मुस्लिमांना नागरिकत्व दिले. यात अदनान सामी व तस्लिमा नसरीन यांचा समावेश आहे.
  • 2014 सालापर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील 566 हून अधिक मुस्लिमांना हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्यात आले होते.
  • 1964 ते 2008 या कालावधीत श्रीलंकेतील चार लाखांहून अधिक तमिळ लोकांना हिंदुस्थानचे नागरिक बनवण्यात आले.
आपली प्रतिक्रिया द्या