157 नर्सिंग महाविद्यालयांच्या स्थापनेची घोषणा, सिकलसेल अ‍ॅनिमिया उन्मूलनाचे उद्दीष्ट्य

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये 157 नव्या नर्सिंग महाविद्यालयांच्या स्थापनेची घोषणा केली. 2014 नंतर आजवर 157 वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली असून या वैद्यकीय महाविद्यालयांच्या ठिकाणीच ही नवी नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या भाषणामध्ये 2047 पर्यंत सिकलसेल अ‍ॅनिमियाच्या उन्मूलनाचे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवले आहे. यासाठी एक मोहीम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेअंतर्गत प्राधान्याने आदिवासी भागात राहणाऱ्या 7 कोटी लोकांची तपासणी केली जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. केंद्र सरकार हे राज्य सरकारांसोबत मिळून या आजाराबद्दल जनजागृती करणार आहे असे त्या म्हणाल्या.

वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी आयसीएमआरच्या प्रयोगशाळा या खासगी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्राध्यापकांसाठी खुल्या करून दिल्या जातील असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. या प्रयोगशाळा संशोधन आणि विकास पथकांमध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांसाठीही खुल्या करून दिल्या जातील जेणेकरून एकत्रित संशोधन आणि नवीन गोष्टींचा शोध लावण्याचे काम अधिक प्रभावीपणे होऊ शकेल.