निर्मला सीतारामण म्हणजे काळी नागीण, तृणमूल नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

1043

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल-भाजप यांच्यात वरचेवर संघर्ष होत असतो. भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांवर टीकाही करत असतात. पण, तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, तृणमूल काँग्रेसचे बांकुरा येथील खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. वाढत्या इंधनदरांच्या विरोधातील एका रॅली दरम्यान त्यानी एक भाषण केलं. त्या भाषणात त्यांनी अर्थमंत्र्यांची तुलना काळ्या नागिणीशी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता नवीन वाद पेटला आहे.

कल्याण बॅनर्जी आपल्या भाषणात म्हणाले की, नरेंद्र मोदी 2019 पूर्वी इथे आले होते. त्यांनी आश्वासन दिलं होतं की, ते देशाला एका चांगल्या स्थितीत नेतील. हो, त्यांनी त्यांचे हे वचन निभावलं आहे. जीडीपी घटून 1 टक्का झाला आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा विजय असो, असं बॅनर्जी त्यांच्या भाषणात म्हणाले.

त्यांनी यापुढे मात्र सीतारमण यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले की, जशी काळी नागीण डसल्याने माणसांचा मृत्यू होतो, तसंच निर्मला सीतारमण यांच्यामुळे लोक मरत आहेत. त्यांनी अर्थव्यवस्थेला नष्ट केलं आहे. त्यांना लाज वाटायला नको का? तुम्ही अर्थव्यवस्था नष्ट केली आणि अजूनही त्याच पदावर आहात. सीतारमण तुम्ही आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. त्या आजवरच्या सगळ्यात कुचकामी अर्थमंत्री आहेत, अशी टीका बॅनर्जी यांनी केली. या प्रकरणी बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपने तक्रार दाखल केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या