फोटोसाठी आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांवर निर्मला सितारामन भडकल्या

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामना आज बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी सासवडमध्ये भाजपच्या बूथ अध्यक्षांची बैठक घेतली. या बैठकीनंतर काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आग्रह धरला. मात्र सीतारामन यांनी नकार दिला. मात्र कार्यकर्ते वारंवार विनंती करायला लागल्यावर त्या त्यांच्यावर भडकलेल्या दिसल्या. महाराष्ट्र टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.

पदाधिकाऱ्यांची बैठक संपवून निर्मला सितारामन बाहेर आल्या. त्या बाहेर उभ्या असताना तिथे एक कार्यकर्ता आला व त्याने मॅडम माझं संपूर्ण कुटुंब तुम्हाला भेटण्यासाठी सकाळपासून इथे थांबलं आहे. आपण आमच्यासोबत एक फोटो काढा, अशी विनंती केली. त्या कार्यकर्त्याची ती विनंती धुडकावून लावत सितारामन यांनी त्याला चांगलंच झापलं.