निर्मलाताई आठवले यांचे पार्थिव पंचतत्त्वात विलीन

सामना ऑनलाईन । ठाणे

स्वाध्याय परिवाराचे प्रर्वतक, तसेच पद्मविभूषण, टेम्पलटन आणि रॅमन मेगसेसे पुरस्कार विजेते कृतिशील तत्त्वचिंतक पांडुरंगशात्री आठवले (दादा) यांच्या पत्नी श्रीमती निर्मलाताई आठवले (ताई) यांचे सोमवार दिनांक ३० जानेवारी २०१७ रोजी संध्याकाळी ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठातील त्यांच्या घरी देहावसान झाले. निर्मलाताईंच्या अंतिम दर्शनानंतर, १ फेब्रुवारीला सायंकाळी तत्त्वज्ञान विद्यापीठ येथे पवित्र मंत्रोच्चारात त्यांच्या सुपुत्री सौ. धनश्री तळवलकर (दीदी) यांनी ताईंच्या पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार केले.

दादांचे स्वाध्याय कार्य भारतातील हजारो गावांमध्येच नव्हे तर जगभरातील इंग्लड, अमेरिका, अखाती देश तसेच जवळपास विश्वाच्या प्रत्येक खंडात विस्तारलेले आहे व दैवी भ्रातृभावाच्या नात्याने लक्षावधी माणसे या कार्यात पारिवारिक भावनेतून जोडलेली आहेत. दादांचे हे खऱ्या अर्थाने वैश्विक कार्य सांभाळणारी दादा व निर्मलाताईंची सुपुत्री सौ.धनश्री तळवलकर (दीदी) यांच्या जडणघडणीतही निर्मलाताई यांचे अनन्यसाधारण योगदान होते. निर्मलाताईंनी सौ. दीदींचे व्यक्तिमत्व विराट स्वाध्याय कार्याची धुरा पेलवण्यासाठीच जणू जाणीवपूर्वक घडवले होते.

दिनांक ३१ जानेवारीच्या सकाळी ७ वाजल्यापासून दर्शनार्थींचा अविरत ओघ संततधारेप्रमाणे चालू आहे. तसेच ज्या विद्यापीठावर व विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर ताईंनी अतीव प्रेम केलं त्या विद्यापीठाचेच विद्यार्थी ताईंच्या पार्थिवाजवळ बसून गीतेच्या १८ अध्यायांचे अखंड पारायण करत होते. परिवारातील कोणालाही कुठल्याही प्रकारचे निमंत्रण न देताही अक्षरश: लाखो स्वाध्यायांची रीघ ताईंचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लागली होती. गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश यांसारख्या अनेक राज्यांप्रमाणे विदेशांतूनही असंख्य स्वाध्यायी केवळ काही मिनिटांच्या दर्शनासाठी विद्यापीठात आले. अनेक सुखवस्तू कुटुंबांपासून ते अगदी आदिवासी, वनवासी अशा सामान्य कुटुंबातीलही लाखो लोक स्वयंप्रेरणेने आले. अमेरिका, इंग्लंड, दुबई, अबुधाबी अशा अनेक देशांतून स्वत:चा वेळ व पैसा याची पर्वा न करता केवळ पूजनीय ताईंच्या प्रेमाखातर इतक्या दूर येणे ही खरोखरच एक विलक्षण व अचंबित करणारी घटना आहे. लाखो स्वाध्यायींच्या हृदयात स्वत:च्या आईपेक्षा मोठे स्थान ताईंचे आहे. अशा गंभीर व भावपूर्ण प्रसंगातही स्वाध्यायींनी आपली शांततापूर्णता व शिस्त कायम राखली हे विशेष.

या प्रसंगी शिवसेना नेते आणि आमदार एकनाथ शिंदे तसेच फ्रान्सिस दिब्रेटो आणि वसईतील काही फादर उपस्थित होते. प्रसिद्ध क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांनी देखील यांनी निर्मलाताईंना श्रद्धांजली वाहिली.

1

 

आपली प्रतिक्रिया द्या