चित्रपटसृष्टी हळहळली, वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी अभिनेत्याचे निधन

कन्नड चित्रपट आणि दूरचित्रवाणीतील सुप्रसिद्ध चेहरा नितीन गोपी यांनी 2 जून रोजी सकाळी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. अवघ्या 39 व्या वर्षी नितीन हे जग सोडून गेल्यामुळे कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

नितीन बेंगळुरूच्या घरी असताना त्यांना अचानक अस्वस्थता जाणवून छातीत दुखू लागले. जवळच्या रूग्णालयात दाखल केल्यानंतर नितिन उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रूग्णालयात नेत असतानाचा त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नितीन गोपी हे कन्नड चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध नाव होते. हॅलो डॅडी, केरलिदा केसरी, मुठ्ठिनंथा हेंडती, निशब्धा आणि चिरबांधव्य यासारख्या चित्रपटांमुळे ते प्रसिध्दी झोतात आले. श्रुती नायडू निर्मित ‘पुनर विवाह’ या लोकप्रिय मालिकेतही नितीन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. चित्रपटांबरोबरच नितीन यांच्या दूरचित्रवाणीवरील अनेक भूमिका गाजल्या आहेत.