देशासमोर 70 वर्षात उद्भवले नाही असे आर्थिक संकट, निती आयोगाच्या उपाध्यक्षांची कबुली

2192

गेल्या 70 वर्षात कधीही उद्भवले नव्हते असे आर्थिक संकट आज देशासमोर आहे असे निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटले आहे. संपूर्ण अर्थ प्रणाली संकटात असून जीएसटी, नोटाबंदीमुळे हे संकट अधिक गडद झाल्याचे मत राजीव कुमार यांनी नोंदवले आहे. बाजारातील चलन तुटवड्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

हल्ली कोणाचा कोणावरही विश्वास राहिलेला नाही. खासगी क्षेत्रात कोणीही कर्ज देण्याची जोखीम उचलायला तयार नाहीये. चलन बाजारात आणण्यापेक्षा ते आपल्याकडेच जपून ठेवण्यावर सगळ्यांनी भर द्यायला सुरुवात केल्याचं राजीव कुमार यांचं म्हणणं आहे. सरकारने ही परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलण्याची गरज असल्याचं कुमार म्हणाले. नोटाबंदी, जीएसटी आणि दिवाळखोरी कायद्यामुळे चलन तुटवडा निर्माण झाला आहे असंही ते म्हणाले.  पूर्वी बाजारामध्ये 35 टक्क्यापर्यंत चलन उपबल्ध असायचे मात्र आता हे प्रमाण बरेच कमी झाले आहे आणि यामुळेच ही समस्या उद्भवल्याचे कुमार यांनी सांगितले.

अर्थव्यवस्थेमध्ये आलेले हे संकट 2009 ते 2014 या काळात बँकांकडून मागचा पुढचा विचार न करता दिल्या गेलेल्या कर्जामुळे निर्माण झाल्याचंही राजीव कुमार म्हणाले. यामुळे 2014 नंतर बँकांच्या एनपीएमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. एनपीए फुगल्याने बँकांची कर्ज देण्याची क्षमचादेखील कमी झाली. याचा फायदा खासगी कर्ज पुरवठा करणाऱ्यांनी उचलायला सुरुवात केली असं निरीक्षण राजीव कुमार यांनी नोंदवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या