कराडमधील येणपे खटला फास्ट ट्रॅकवर चालवा – प्रा. बानगुडे पाटील

सामना प्रतिनिधी । कराड

कराड तालुक्यातल्या येणपे येथील बलात्कार आणि खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, तसेच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केली आहे. शिवसेना पीडित कुटुंबाच्या पाठीशी असून याचा पाठपुरावा आपण करणार असल्याचे प्रा. बानुगडे-पाटील यांनी पिडीत कुटुंबाची भेट घेऊन सांगीतले.

येणपे येथील बलात्कार आणि खून प्रकरणी कराड तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेतील आरोपींना पोलीस प्रशासनाने अटक केली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगून, मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रा. बानुगडे-पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, सदर घटनेमुळे येणपे गावातील महिला व मुलींचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्याशी प्रा. बानुगडे-पाटील यांनी चर्चा केली. तसेच घटनेचे संतप्त पडसाद उमटून गावातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठीही प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.