जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी महायुतीच्या उमेदवाराला विधानसभेत पाठवा – नितीन बानगुडे पाटील

1245

शिवसेना संघटना सदैव जनतेसाठी लढणारी, त्यांना न्याय मिळवून देणारी, अन्यायाविरुद्ध उभी राहणारी असून या संघटनेच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करुन विकासाबरोबर जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी विधानसभेत पाठवा, असे आवाहन प्रख्यात शिवचरित्रकार नितीन बानगुडे पाटील यांनी बुलढाणा येथे केले. बुलढाणा येथे जयस्तंभ चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर युतीचे उमेदवार संजय गायकवाड, जिल्हा संपर्कप्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत सह युतीचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

बानगुडे पाटील म्हणाले की, 80 टक्के समाजकारण व 20 टक्के समाजकारणाचा धर्म हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला शिकवला, त्याच विचारांवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वाटचाल करीत असून शिवसेना हाच एक पक्ष अन्यायाविरुध्द तातडीने धावून जाणारा आहे. शिवसेनेने कायम न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला आहे. आताही विविध योजनांच्या माध्यमातून सेनेने मतदारांना साद घातली असून, शिवसेना जाहीरनामा नाहीतर वचननामा सादर करते असे बानगुडे पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार संजय गायकवाड हेही आक्रमकपणे अन्यायाच्या विरोधात धावून जाणारे आहेत त्यामुळे त्यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहनही यावेळी केले.

आपली प्रतिक्रिया द्या