अनलॉकनंतर नितीन गडकरी इन ऍक्शन, मात्र दिल्लीच्या वर्तुळात चर्चा नाराजीची

अनलॉकनंतर भाजप नेते, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांनी दिल्लीत पुन्हा इन ऍक्शन होत कामकाजाला सुरुवात केली आहे. मात्र लॉकडाऊननंतर दिल्लीतून गेले अडीच महिने गायब असलेल्या गडकरींच्या नाराजी नाट्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात संयुक्त सचिव दर्जापेक्षा वरच्या अधिकारी आणि मंत्र्यांनी दिल्लीतच थांबावे असे आदेश पंतप्रधानांनी दिले असतानाही, गडकरींनी त्याकडे कानाडोळा करत नागपूरचा मुक्काम वाढवत मोदी सरकारची लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टंसिंग राखल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. वेगळ्याच चर्चेला पेव फुटले होते. या सगळ्याला आता गडकरींच्या इन ऍक्शन होण्याने तूर्तास पूर्णविराम मिळाला असला, तरी नाराजीच्या चर्चेला मात्र पूर्णविराम मिळालेला नाही.

रस्ते विकास मंत्रालयातील वाढत्या हस्तक्षेपामुळे नाराजी
मोदी-2 मध्ये केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा यांची कॅबिनेटमध्ये एन्ट्री झाल्याने गडकरी तसे बाजुलाच पडलेले. त्यातच अमित शहा यांनी थेट हस्तक्षेप करत गडकरींच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या त्यांच्या एका खासमखास माणसाला असंख्य तक्रारींचा दाखला देऊन घरी बसवल्याने नितीन गडकरी खट्टू झाले होते. त्यातच गडकरींना अनुकूल असणारे सचिव त्यांच्या खात्यात नेमण्यात आले. रस्ते विकासासंदर्भातील रिपोर्ट हे सचिव थेट पंतप्रधान कार्यालयाला करत असल्याने त्यांच्या नाराजीत भर पडली.

खाते जाण्याची कुणकुण लागताच उपद्रव मूल्य वाढवले
मध्यप्रदेशात काँग्रेसमध्ये फोडाफोडी करून भाजपने सरकार स्थापन केले. यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांना केंद्रात गडकरींकडे असलेले केंद्रीय रस्ते विकास खाते देण्याचे आश्वासन भाजपा श्रेष्ठींनी दिले होते. याची कुणकुण लागल्यामुळे गडकरींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातील आपला मुक्काम वाढवून आपले राजकीय उपद्रवमूल्य दाखविण्याचा एक प्रकारे प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या