मला तुमचं अभिनंदन करायलाही लाज वाटतेय! गडकरींनी कामचुकार अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचे काम पूर्ण व्हायला तब्बल दहा वर्षे लागली. या कामाला झालेल्या प्रचंड विलंबाबद्दल केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी चांगलेच संतापले. मला तुमचे अभिनंदन करायलाही लाज वाटतेय, अशा शब्दांत त्यांनी कामचुकार अधिकाऱयांना त्यांनी फैलावर घेतले.

महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले, कोणतेही काम पूर्ण झाल्यानंतर सगळय़ांचे अभिनंदन केले जाते, पण मला संकोच वाटतोय की, तुमचे अभिनंदन कसे करू? 2011 मध्ये याची निविदा निघाली आणि हे दोनशे-अडीचशे कोटींचे काम पूर्ण होण्यासाठी एवढी वर्षे लागली.

या वेळेत तीन सरकारं आणि आठ अध्यक्ष राहिले. प्राधिकरणाच्या सध्याच्या अध्यक्षांचा याच्याशी काही संबंध नाहीये. पण ज्या महान लोकांनी 2011 पासून 2020 पर्यंत हे काम केलंय, त्यांचे फोटो या कार्यालयात लावायला हवेत, असा टोला गडकरींनी लगावला.

दिल्ली-मुंबई हे काम तीन वर्षांत पूर्ण करणार असल्याचं आपण अभिमानानं सांगतो आहोत. 80 हजार ते 1 लाख कोटी रुपये इतक्या मोठय़ा निधीतून उभारण्यात येणाऱया कामाला फक्त तीन साडेतीन वर्षे जर लागणार असतील, तर या दोनशे कोटींच्या कामासाठी आपण दहा वर्षे घालवली हे अभिनंदन करण्यासारखं नाही.

पण मला हे सांगायची लाज वाटतेय, जे विकृत विचारांचे अधिकारी आहेत, ज्यांनी निर्णय न घेता समस्या तयार केल्या. मुख्य महाव्यवस्थापक आणि महाव्यवस्थापकांची परंपरा किती नालायक आणि निकम्मी आहे याचं उदाहरण म्हणजे ही इमारत आहे, असा संताप गडकरी यांनी व्यक्त केला.

…अशा लोकांची धुलाई करण्याशिवाय पर्याय नाही

माझं नाव तर बदनाम झालंच आहे. पण आता, रस्त्यांचं काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिकाऱयांना हाकलून द्यावं हेच माझं उद्दिष्ट आहे. मला मंत्र्यांचे अधिकार माहिती आहेत. माझा स्वभाव संवेदनशील आहे, लोकांचं वाईट करण्याचा नाही. पण आता मला वाटायला लागलंय की, अशा लोकांची धुलाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीयं, अशा शब्दांत गडकरींनी अधिकाऱयांना सुनावलं.

आपली प्रतिक्रिया द्या